आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस असल्याचे सांगून तरुणांना लुबाडले

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 25, 2026
Spread the love

पुणे : पोलीस असल्याचे सांगून पहाटेच्या सुमारास जाणाऱ्या तिघा तरुणांकडून मोबाईलवरील फोन पेवरून पैसे ट्रान्सफर करण्यास लावून जबरदस्तीने लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अक्षयकुमार काशीराम राव (वय २८, रा. सोलापूर रोड, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोलापूर रोडवरील मंम्बा देवी चौकाजवळील नलिनी सोसायटीसमोर रविवारी पहाटे पावणेचार वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दोन मित्रांसोबत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून हेल्मेट घातलेला चोरटा आला. त्याने फिर्यादी यांना पोलीस असल्याचे सांगून, ‘इतक्या रात्री गुन्हे करत फिरता का?’ असे विचारून दमदाटी केली.

त्यानंतर फिर्यादी यांच्या दोन मित्रांच्या मोबाईलमधील फोन पेवरून फिर्यादी यांच्या फोन पेवर रक्कम पाठविली. तसेच, फिर्यादी यांच्या मोबाईलचा पासवर्ड व फोन पेचा पिन नंबर जाणून घेऊन त्यांच्या मोबाईलवरून ३८ हजार ९०० रुपये ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली आणि तो निघून गेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.