ज्येष्ठ महिला वकिलाला ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी
सायबर चोरट्यांनी केली ७० लाखांची फसवणूक : सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही अटकेची पद्धत नसते. सायबर चोरट्यांच्या या धमकीला कोणीही घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क साधावा, असे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीद्वारे रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने सांगितले जाते. तरीही अनेक जण सायबर चोरट्यांच्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या धमकीला बळी पडून फसवणूक करून घेतात. सायबर चोरट्यांच्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या धमकीला चक्क एक ज्येष्ठ महिला वकील बळी पडली.
सायबर चोरट्यांनी तिची ७० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत पिसोळी येथील ६८ वर्षांच्या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार ५ ते ८ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी ५ ऑगस्ट रोजी महिला वकिलांच्या मोबाईलवर संपर्क साधला.
स्टेट बँकेतून बोलत असल्याची बतावणी सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. तुमच्या नावाने क्रेडिट कार्ड असून, त्यावर १ लाख ९ हजार ६९९ रुपयांचा गुन्हेगारांसोबत चोरी, मनी लॉड्रिंग, मानवी तस्करी या गुन्ह्यांमध्ये तुमचे नाव जोडण्यात आले आहे.
या प्रकरणात ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येणार आहे, अशी धमकी त्यांना देण्यात आली. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे द्यावे लागतील, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले.
त्यानंतर महिलेने चोरट्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये तीन दिवसांत वेळोवेळी ७० लाख रुपये जमा केले. चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संगिता देवकाते तपास करीत आहेत.
