आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 10, 2026
Spread the love

पुणे : आखाड पार्टीचे जेवण बनवित असताना पूर्ववैमनस्यातून तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या गुंडासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पियुष ऊर्फ युवराज गणेश भिसे (वय २२, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कार्तिक अनिल जाधव (वय २३), प्रज्वल संदीप शिंदे (वय २४), नरेश ससाणे (वय २०), दादा पाखरे (वय २४, रा. लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोणी गावातील महादेव मंदिराच्या पाठीमागील शेडमध्ये रविवारी, ९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज भिसे हा रिक्षाचालक आहे. त्याला तीन महिन्यांपूर्वी परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त यांनी तडीपार केले आहे. तेव्हापासून तो नांदेड येथे मित्रासोबत राहत होता. ७ ऑगस्ट रोजी त्याच्या आईचा फोन आला. ‘माझी प्रकृती ठीक नाही, एकदा येऊन भेटून जा,’ असे आईने सांगितले. त्यावरून तो ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात आला. आईची भेट घेऊन तो घरी थांबला होता. त्यावेळी त्यांचे मामा कृष्णा म्हात्रे यांनी ‘आम्ही रविवारी आखाड पार्टी करत आहोत. तू ये,’ असे सांगितले.

त्याप्रमाणे तो रविवारी सकाळी महादेव मंदिराच्या पाठीमागील शेडमध्ये गेला. तेथे जेवण बनविण्याचे काम सुरू होते. युवराज भिसे त्यांना मदत करत होता. त्यावेळी कार्तिक जाधव, प्रज्वल शिंदे, नरेश ससाणे, दादा पाखरे तेथे आले. जुना राग मनात धरून चौघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कार्तिक जाधव याने तेथे पडलेला दगड घेऊन डोक्यात मारून त्याला जखमी केले. त्याला सोडविण्यासाठी आलेल्या बाळा भांड यालाही चौघांनी मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तडीपारीचा भंग करून आलेल्या युवराज भिसे याला कोयत्यासह पकडले.

युवराज भिसे हा विना परवानगी तडीपारीचा भंग करून शहरात आला. जखमी अवस्थेत मोठमोठ्याने आरडाओरड करून हातात कोयता घेऊन शिवीगाळ करताना तो आढळून आला. त्यावरून पोलिसांनी युवराज भिसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार शिंदे तपास करीत आहेत.