आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘तिरंगा रॅली’निमित्त डेक्कन परिसरात मंगळवारी वाहतूक बदल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 10, 2026
Spread the love

पुणे : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुण्यात मंगळवारी डेक्कन जिमखाना परिसरात तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सहभागी होणार आहेत. यामुळे फर्ग्युसन रोड बंद करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

‘तिरंगा रॅली’चा प्रारंभ मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास फर्ग्युसन रोडवरील ललित महल हॉटेल चौकातून होणार आहे. श्री ज्ञानेश्वर पादुका चौक, श्री तुकाराम महाराज पादुका चौक, गोखले स्मारक चौक (गुडलक चौक), गरवारे चौक असा तिरंगा रॅलीचा मार्ग राहणार आहे. रॅलीनिमित्त डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोड परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे :
स्वारगेटहून टिळक रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी सारसबाग, दांडेकर पूल चौक, म्हात्रे पूल, नळस्टॉप चौक, विधी महाविद्यालय रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
स्वारगेटहून डेक्कन जिमखानामार्गे जुन्या मुंबई-पुणे रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पूरम चौक, बाजीराव रस्ता, वेधशाळा चौकातून इच्छितस्थळी जावे.
कर्वे रस्त्याने खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.