उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला अटक
मद्यविक्री परवान्यांसाठी २२ लाखांची लाचेची मागणी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी व्यावसायिकाकडे तब्बल २२ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७, रा. सारथी शिवाली बिल्डिंग, मृत्युंजय महादेव मंदिरासमोर, कर्वे रोड, कोथरूड, मूळ रा. गजानन नगर, परभणी) असे अटक केलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लायसन्स कन्सल्टंट असलेल्या व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी तक्रारदारांच्या एका फर्मचा एफएल-३ परवाना मिळविण्याच्या कामी फाईल मंजुरीसाठी पुढे पाठविल्याच्या मोबदल्यात १२ लाख रुपये, तसेच त्याच फर्मची मायक्रो ब्रेव्हरी फीची फाईल मंजूर करण्यासाठी ८ लाख रुपये, अशी एकूण २० लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.
याबाबतची तक्रार १० एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने १३ एप्रिल, तसेच २१ मे आणि २२ मे २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली.
त्यामध्ये जितेंद्र पाटील यांनी तक्रारदारांकडे एकूण २२ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती ११ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाच मागितल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. येरवडा येथील कार्यालयातून जितेंद्र पाटील याला सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलीस अंमलदार भूषण ठाकूर, विकास आडके, चंद्रकांत कदम, विशाल माने आणि वनिता गोरे यांनी केली आहे.
