गणेश पेठेत मारहाणीत रिक्षाचालक तरुणाचा खून
पायावर पाय पडल्याचे झाले निमित्त : लक्ष्मी रोडवरील डुल्या मारुती चौकातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हातगाडीवर मिसळ खात असताना गर्दीमुळे एका तरुणाचा चुकून दुसऱ्याच्या पायावर पाय पडला. या किरकोळ कारणावरून त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत पोटात आणि छातीत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने रिक्षाचालक तरुणाचा मृत्यू झाला. फरासखाना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.
शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत शिवमचा भाऊ श्रीरुषल राजेश परदेशी (वय ३७) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकातील दुर्वेश स्नॅक्स सेंटर या हातगाडीसमोर ९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव साळुंखे व शिवम परदेशी हे एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. शिवम परदेशी हा रिक्षाचालक असून, वैभव साळुंखे हा नोकरी करतो.
रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डुल्या मारुती चौकातील वडापाव सेंटरवर शिवम हा मिसळ खात होता. त्यावेळी गर्दी झाल्याने चुकून पाय लागल्याने शिवम व वैभव यांच्यात वादावादी झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
वैभव याने शिवमच्या छातीवर, पोटावर व शरीरावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तेथील लोकांनी दोघांचे भांडण सोडविले. त्यानंतर शिवम हा घरी गेला.
त्यावेळी आईने त्याला चहा बनवून देऊ का, असे विचारले. त्यावर तो म्हणाला की, माझ्या छातीत व पोटात खूप दुखत असून, मी थोडा वेळ आराम करतो. असे सांगून तो घरामध्ये जाऊन झोपला.
सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आईने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्याच्या आईने इतरांच्या मदतीने त्याला केईएम रुग्णालयात नेले.
तेथे उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शिवमचे शवविच्छेदन करण्यात आले. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने शिवमचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.
फरासखाना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये वैभव व शिवम यांच्यात हाणामारी झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून वैभव साळुंखे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राजेश महाला तपास करीत आहेत.
