दारूच्या नशेत तरुणाने केली वाहनांवर दगडफेक
मालकाबरोबर झालेल्या भांडणाचा राग : सिंहगड रोडवरील सुयोग श्री सोसायटीमधील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ज्या दुकानदाराने आश्रय दिला, त्याच्याबरोबर वाद झाल्याने दारूच्या नशेत एका तरुणाने मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या. या घटनेत सहा कारचे नुकसान झाले आहे. ही घटना सिंहगड रोडवरील विश्रांती चौकाजवळील सुयोग श्री सोसायटीमध्ये मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली.
शंतनु सुरेश मैद (वय १९, रा. विश्रांतीनगर, सिंहगड रोड) याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनु मैद याला येथील गॉगल विक्री करणाऱ्या दुकानदाराने आश्रय दिला आहे.
१९ वर्षांच्या या तरुणाचा दुकानदाराबरोबर वाद झाला. त्यानंतर त्याने दारूच्या नशेत मध्यरात्री पार्क केलेल्या गाड्यांवर दगडफेक करून सहा गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत.
पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे तपास करीत आहेत.
