आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विश्रामबाग पोलिसांनी आंतरराज्य टोळीला केले जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 11, 2026
Spread the love

पुणे : घरफोडी करून सतत वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे ३७ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत.

शंकरसिंग ऊर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय २७, रा. रामटेकडी, हडपसर), रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगार (वय २६, रा. एकतानगर, बडोदा, गुजरात), अक्षयसिंग ऊर्फ अक्षय बिरुसिंग जुनी (वय २२, रा. बिराजदार नगर, हडपसर), सोनुसिंग शाखासिंग शिकलीगर/तीलपिटीया (वय २२, रा. एकतानगर, बडोदा, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या चोरट्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ आणि दत्तवाडी परिसरातील १, असे एकूण ९ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

शंकरसिंग जुनी हा भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, आंबेगाव पोलीस ठाणे आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील ३ गुन्ह्यांमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून वाँटेड होता.

आरोपी स्वतःची ओळख लपविण्यासाठी डोक्यावर केसांचा टोप आणि तोंडाला मास्क वापरत होते. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा तोडून चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी उंड्री-पिसोळी येथील परिसरात फिरत आहेत.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके व त्यांच्या सहकाऱ्यांनी उंड्री-पिसोळी परिसर पिंजून काढला.

परंतु आरोपी सराईत असल्याने त्यांची जागा सतत बदलत होती. पुन्हा बातमीदाराने माहिती दिली की, आरोपी एका गाडीतून उंड्री-पिसोळी येथील डोंगराच्या रस्त्याने येत आहेत.

त्यावरून पोलिसांनी या गाडीला चारही बाजूंनी घेराव घालून चौघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी पुणे शहरातील ९ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे ३७ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शशिकांत दरेकर, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवा गायकवाड, अर्जुन थोरात, सागर मोरे, फिरोज इनामदार आणि नितीन बाबर यांनी केली आहे.