श्रीलंकेतील ‘जेपीएल’साठी ‘पुणे पेशवाज’ संघाची घोषणा
जीतो अपेक्सतर्फे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान ‘जेपीएल’चा पहिला हंगाम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : श्रीलंकेत होणाऱ्या ‘जीतो प्रीमियर लीग’ (JPL) क्रिकेट स्पर्धेसाठी पुण्याचा अधिकृत संघ असलेल्या ‘पुणे पेशवाज’ संघाचे अनावरण द कोरिंथियन्स रिसॉर्ट क्लब येथे भव्य सोहळ्यात आणि मोठ्या उत्साहात झाले. जीतो अपेक्सच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, जेपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत ‘पुणे पेशवाज’ संघ पुण्याचे प्रतिनिधित्व करेल आणि क्रिकेटच्या या महत्त्वपूर्ण स्पर्धेत आपली दमदार छाप पाडण्याचा प्रयत्न करेल.
‘पुणे पेशवाज’ संघाच्या अनावरण सोहळ्यास जीतो अपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी आणि ‘जीतो स्पोर्ट्स’चे अध्यक्ष विकी ओसवाल यांच्यासह जीतो अपेक्स आरओएम आणि जीतो पुणे चॅप्टरमधील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने आणि प्रोत्साहनपर शब्दांनी संघाचे मनोबल उंचावले तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
‘पुणे पेशवाज’ संघाची मालकी विजय भंडारी, राजेशकुमार सांखला, विशाल चोरडिया, राजेंद्र जैन, डॉ. रमेश तेजावत, सुजित भटेवरा, दीपक जैन, अमोल कुचेरिया आणि निकुंज ओसवाल यांच्याकडे आहे. या सर्वांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती होती.
जीतो अपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांनी ‘जेपीएल’च्या व्यापक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. तसेच, या लीगला अभूतपूर्व उंचीवर नेऊन समाजातील क्रिकेटसाठी एक खऱ्या अर्थाने जागतिक व्यासपीठ निर्माण करण्याच्या ‘जीतो’च्या नियोजनाबद्दल त्यांनी माहिती दिली. विकी ओसवाल यांनी कोलंबो येथे होणाऱ्या ‘जेपीएल’च्या पहिल्या हंगामाबद्दल आणि लीगच्या पुढील वाटचालीच्या आराखड्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
एका विशेष परिसंवादादरम्यान मालकांनी ‘पुणे पेशवाज’बाबतची आपली दूरदृष्टी आणि जेपीएलविषयीच्या आपल्या आकांक्षा मांडल्या. तसेच, केवळ एक यशस्वी क्रिकेट फ्रँचायझी नव्हे, तर पुण्याचा अभिमान, जोश आणि उत्साह यांचे प्रतिनिधित्व करणारा संघ उभारण्याबाबतची आपली कटिबद्धताही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ‘पुणे पेशवाज’ संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफचे प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साहात आणि टाळ्यांच्या गजरात आगमन झाले. त्यांचा सत्कार करून त्यांची ओळख करून देण्यात आली. संघाचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत मुंढे असून, कर्णधार रुषभ राठोड आणि उपकर्णधार यश नहार आहेत. या पथकात अनुपम संकलेचा, स्वप्निल गुगळे, निलय शिंगवी, नील गांधी, निखिल लुनावत, अनिकेत पोरवाल, दीपक डांगी, हर्ष संघवी, हर्ष ओसवाल, अमन दोशी, अनुज छाजेड, यश बंबोली, सौरभ शिंगवी, यश डागा, ईशान ओसवाल, निखिल जैन, चिराग गादीया, श्रेयांक जैन, रोणक खंडेलवाल, रोनक पारेख, प्रचित भळगत, शितीज जैन यांच्यासह शुभम चव्हाण स्पोर्ट्स मॅन्युअल थेरपिस्ट आणि डॉ. श्रेयश बाफना फिजिओथेरपिस्ट म्हणून आहेत.
‘पुणे पेशवाज’च्या अधिकृत गीताचे यावेळी भव्य अनावरण करण्यात आले. या गीतामुळे संघाला स्वतःची एक विशिष्ट ओळख आणि प्रेरणादायी घोषणा मिळाली असून, आगामी प्रवासासाठी एक उत्तम सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम केवळ एका क्रिकेट संघाच्या अनावरणापुरता मर्यादित नव्हता, तर तो पुण्याच्या क्रीडा क्षेत्रातील एका नवीन प्रवासाची सुरुवात होती.
संघाच्या मालकांचा उत्साह, प्रतिभावान खेळाडूंचा संघ, सक्षम नेतृत्व आणि पुणेकरांचा पाठिंबा यांच्या जोरावर ‘पुणे पेशवाज’ आता कोलंबोला जाऊन ‘जेपीएल’च्या पहिल्या हंगामात सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. हा सोहळा अविस्मरणीय आणि यशस्वी करण्यासाठी प्रियंका परमार, जिनेंद्र लोढा, आर्या चोरडिया, शुभम भंडारी, शुभम राठोड आणि आयुष पालेशा यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले.
जेपीएल जागतिक क्रिकेटचे व्यासपीठ बनेल
जीतो अपेक्सच्या वतीने आयोजित केलेली जेपीएल क्रिकेट स्पर्धा जागतिक दर्जाची आहे. यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि प्रशिक्षण हे जागतिक दर्जाचे आहे. त्यामुळे या स्पर्धेतून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील आणि त्यातील खेळाडू देशासाठी खेळतील. त्यामुळे जेपीएलकडे यापुढील काळात जागतिक दर्जाची स्पर्धा म्हणून पाहिले जाईल आणि ते जागतिक क्रिकेटचे व्यासपीठ बनेल. — विजय भंडारी, राष्ट्रीय अध्यक्ष, जीतो अपेक्स
