आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तिघा आरोपींकडून ३ पिस्तुले, १ जिवंत काडतूस जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 11, 2026
Spread the love

पुणे : जांभुळवाडी येथील पाझर तलावाजवळ थांबलेल्या तिघांना आंबेगाव पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

राजन विनोद शहा (वय २३, रा. पोकळे क्रिस्टल सोसायटी, काळभैरवनाथ मंदिरासमोर, धायरीगाव), अनिल कैलास चौधरी (वय २६, रा. संदेश रेसिडन्सी, धायरीगाव) आणि प्रथम अरुण रेणुसे (वय २४, रा. जाधव हाईट्स, नाईक आळी, धायरीगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आंबेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोत्रे, सचिन गाडे आणि सुभाष मोरे यांना १० ऑगस्ट रोजी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जांभुळवाडी पाझर तलावाच्या शेजारील मोकळ्या जागेत तिघेजण थांबले असून त्यांच्याकडे पिस्तूल आहे. या माहितीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊन आंबेगाव पोलीस ठाण्यातील पथक पाझर तलावाच्या शेजारी पोहोचले. तेथे थांबलेल्या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून एक लाख २० हजार ५०० रुपये किमतीची तीन गावठी पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अंमलदार चेतन मोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, आकाश फासगे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, शिवाजी पोटोळे, योगेश जगदाळे, राकेश टेकावडे आणि फिरोज शेख यांनी ही कारवाई केली.

राजन शहा याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. यापूर्वी त्याच्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे संरक्षणासाठी त्याने तीन पिस्तुले घेतली होती. अनिल चौधरी याची पानटपरी असून, प्रथम रेणुसे याचे गॅरेज आहे. या दोघांनी राजन शहाकडून पिस्तुले विकत घेतली होती.