ज्येष्ठ नागरिकांची ९६ लाखांची फसवणूक
शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष : सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी ९६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कोथरूडमधील भुसारी कॉलनीत राहायला आहेत.
सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर २८ जून रोजी मेसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते.
चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक योजनेबाबत माहिती देण्यासाठी एक ॲप मोबाइलमध्ये घेण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने सुरुवातीला काही रक्कम भरली.
चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना कोणताही परतावा दिला नाही. ज्येष्ठ नागरिकाने सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात गेल्या दोन महिन्यांत वेळोवेळी ९६ लाख ५० हजार रुपये जमा केले.
परताव्याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत.
मतदार नोंदणी यादी अर्जात दुरुस्तीची बतावणी करुन ज्येष्ठाची फसवणूक – मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात (एसआयआर फॉर्म) त्रुटी राहिल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. तक्रारदाराच्या वडिलांच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. निवडणूक आयोगातील कर्मचारी असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. चोरट्यांनी मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात त्रुटी राहिल्याची बतावणी तक्रारदारांच्या वडिलांकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर एक एपीके फाईल पाठविली. एपीके फाईल उघडताच चोरट्यांनी मोबाइलचा तांत्रिक ताबा घेतला. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला होता. चोरट्यांनी बँक खात्यातून ४ लाख ९८ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करत आहेत.
