आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सायबर टोळीतील फरार रिल स्टार जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 12, 2026
Spread the love

पुणे : ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एका फरार आरोपीला अटक केली आहे.

रोहन रामेश्वर जाधव (वय २६, रा. सूर्या अपार्टमेंट, गजानन नगर, पिंपळे गुरव) असे या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी यापूर्वी हर्षद सुभाष धनतोले (वय २६, रा. कर्वेनगर), समर्थ सुरेश देशमुख (वय २४, रा. कर्वेनगर), प्रणव करणसिंग आर्या (वय ३१, रा. ग्रेटर नोएडा, दिल्ली) यांना अटक केली होती.

त्यांच्या चौकशीतून रोहन जाधव याचे नाव निष्पन्न झाले होते. त्याने वापरलेल्या बँक खात्यांद्वारे झालेल्या फसवणुकीचे २९ गुन्हे आणि एनसीआरपीवरील तक्रारी उघडकीस आल्या आहेत.

तसेच, फरार आरोपीचा हाँगकाँगमधील संशयित आरोपींशी संपर्क असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने रोहन जाधवविरुद्ध नॉन-बेलेबल वॉरंट काढले होते.

रोहन जाधव याचा शोध घेत असताना तपास पथकाने त्याचे विविध बँक व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण आणि गुन्ह्यातील इतर आरोपींशी असलेले संबंध याबाबत पुरावे गोळा केले.

या पुराव्यांच्या आधारे रोहन जाधव याला अटक करण्यात आली आहे. रोहन जाधव हा मुळचा छत्रपती संभाजीनगरचा असून, तो २०२२ पासून पिंपळे निलख येथे राहायला आहे. तो रिल स्टार म्हणून काम करीत होता.

त्याचे शिक्षण बी.एस्सी. झालेले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते आणि पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.