आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चंदुकाका सराफ यांची फसवणूक करणारा जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 12, 2026
Spread the love

पुणे : चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानातून सोने खरेदी करण्याचा बहाणा करून १४ लाख ७८ हजार रुपयांची सोन्याची बिस्किटे घेऊन पळून गेलेल्या भामट्याला चंदननगर पोलिसांनी चंद्रपूर येथून जेरबंद केले आहे.

सिद्धार्थ देविदास झेंडे (वय ३८, रा. म्हसोबाची वाडी, ता. इंदापूर) असे या भामट्याचे नाव आहे.

चंदननगर येथील चंदुकाका सराफ या दुकानात ३ व ४ ऑगस्ट रोजी सिद्धार्थ झेंडे हा एका महिलेला घेऊन दागिने खरेदी करण्यासाठी गेला होता. आम्ही लग्न करणार असल्याचे सांगून त्याने ९६ लाख रुपयांचे दागिने खरेदी केले. त्याचा धनादेश दिला. मात्र, नंतर दागिने घेऊन जातो, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी महिलेला पाठवून १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांची सोन्याची बिस्किटे धनादेश देऊन खरेदी केली. त्याने दिलेला धनादेश खात्यात पैसे नसल्याने परत आला. बँक मॅनेजरने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी आरोपीबद्दल माहिती घेतली असता तो गावी नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी चंद्रपूर येथे असल्याची माहिती मिळवली. पोलिसांचे पथक पाठवून त्याला ताब्यात घेण्यात आले. इंदापूर येथील एका सोनाराला सोने विकून त्याच्याकडून रोख रक्कम घेतल्याची माहिती त्याने दिली. आरोपीकडून सोने विक्री करून आलेल्या रोख रकमेपैकी ८ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक पोलीस आयुक्त सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, सचिन कदम, रामदास घावटे, किरण घुटे, प्रवीण भालचीम, माऊली लहाने यांनी केली आहे.

अनेक ठिकाणी केली फसवणूक
सिद्धार्थ झेंडे हा प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करून फसवणूक करत असे. त्याने छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील अनेक कार व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक तसेच महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली असल्याचे तपासात दिसून आले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी भिगवण पोलीस ठाणे व विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.