आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नगर रचनाकार विकास ढेकळे यांच्यावर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 13, 2026
Spread the love

पुणे : सहायक नगर रचनाकार विकास ढेकळे यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपये (१८ टक्के) इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यासह साथ देणाऱ्या पत्नीवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

विकास किसन ढेकळे (वय ५०, रा. पर्ल टॉवर, गाडीतळ, हडपसर) आणि भाग्यश्री विकास ढेकळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर रचना विभागाचे सहायक नगर रचनाकार विकास ढेकळे यांच्याविरुद्ध उघड चौकशी करण्याचा आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाला होता. ही चौकशी सुरू असताना गेल्या वर्षी त्यांच्याविरुद्ध लाचेच्या मागणीबाबत तक्रार मिळाली होती. त्यानुसार सापळा कारवाई करण्यात आली होती. बारामती शहर पोलीस ठाण्यात २० मार्च २०२५ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विकास ढेकळे यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशीमध्ये १७ ऑगस्ट १९९९ ते २० मार्च २०२५ या कालावधीचे परीक्षण करण्यात आले. या चौकशीत ढेकळे यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपये (१८ टक्के) इतकी अपसंपदा बाळगल्याचे आढळून आले. ही अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण करण्यासाठी त्यांची पत्नी भाग्यश्री ढेकळे यांनी प्रोत्साहन दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

या उघड चौकशीदरम्यान बनावट पावत्या सादर केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मनीषा झेंडे यांनी ही उघड चौकशी केली. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके तपास करीत आहेत.

नगर रचना विभागातील अपसंपत्तीची दुसरी कारवाई

नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावरही अपसंपदा बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली होती. नगर रचना विभागातील ही दुसरी कारवाई आहे. हनुमंत नाझीरकर यांच्या कुटुंबीयांच्या नावावर ५३ स्थावर मालमत्ता, ३७ कंपन्या आणि १५० बँक खाती आढळून आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तपासात त्यांची ८२ कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्यावर ४० हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा तपास करणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक मिळाले आहे.