आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शी शहर पोलिसांची धडक कारवाई; दोन सराईत वाहनचोर जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 13, 2026
Spread the love

बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या बुलेट मोटारसायकलीच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरवत दोन सराईत वाहनचोरांना अटक केली. आरोपींकडून बार्शीसह पुणे, लातूर, इंदापूर, येडशी आणि इतर परिसरातून चोरी केलेल्या चार बुलेटसह एकूण १० मोटारसायकली, असा सुमारे ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

राऊत चाळ, स्टेशन रोड, बार्शी येथील रहिवासी प्रतीक चंद्रकांत पवार (वय २०) यांची १ लाख २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बुलेट ३५० EFI (क्र. MH25AY2476) ही ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली होती.

याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेचा समांतर तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून सुरू होता.

पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यातून आकाश हरिचंद्र राठोड (वय १९, रा. कन्हेरगाव, ता. परळी, जि. बीड) आणि ऋषिकेश महादेव सुरवसे (वय २१, रा. मांजरी, ता. व जि. लातूर) या दोघांना संशयित म्हणून निष्पन्न करून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, आरोपींनी बार्शीसह लातूर, पुणे, इंदापूर, येडशी आणि इतर परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणांहून एकूण १० मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत ८ लाख २० हजार रुपये आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमध्ये हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो स्प्लेंडर, हिरो एचएफ डीलक्स, हिरो पॅशन प्रो, हिरो होंडा मोटारसायकल तसेच रॉयल एनफिल्डच्या चार बुलेट मोटारसायकली आणि बजाज कंपनीच्या एका मोटारसायकलीचा समावेश आहे.

यातील काही वाहनांचे नोंदणी क्रमांक उपलब्ध असून, काही वाहनांचे नोंदणी क्रमांक अद्याप प्राप्त होणे बाकी आहे. जप्त करण्यात आलेल्या इतर वाहनांच्या मूळ मालकांचा तसेच संबंधित वाहनचोरीच्या घटनांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

त्यामुळे वाहनचोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे, पोहेकॉ प्रविण साठे, सुनील बनसोडे, मपोहेकॉ शबाना कोतवाल, पोकॉ धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, अजिज शेख, अंकुश जाधव, दत्ता सोमवाड, अविनाश पवार, राहुल उदार, प्रल्हाद आकुलवार, संतोष जाधवार, सचिन नितनात, सतीश उघडे, सचिन राऊत तसेच सोलापूर ग्रामीणचे सायबर पोकॉ राहुल सोनकर यांनी ही कामगिरी पार पाडली.

नागरिकांनी आपल्या वाहनांना योग्य लॉक सिस्टीमचा वापर करावा, वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन बार्शी शहर पोलिसांनी केले आहे.