गँगस्टर नीलेश घायवळचे २ शार्प शूटर जेरबंद
मोक्कामधील सराईत गुन्हेगार : १ वर्षापासून होते फरार, कोथरूड पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गोळीबार करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गँगस्टर नीलेश घायवळ टोळीवर गेल्या वर्षी २ खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांमध्ये मोक्का कारवाई करण्यात आली आहे. यामधील १ वर्षापासून फरार असलेल्या शार्प शूटरसह दोघा गुन्हेगारांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष अनंत धुमाळ (रा. इंदिरा शंकर नगरी, पौड रोड, कोथरूड) आणि विपुल उत्तम माझिरे (वय ३०, रा. रावडे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विपुल माझिरे हा शार्प शूटर म्हणून ओळखला जातो.
नीलेश घायवळ याने आपल्या टोळीतील गुंडांना टोळीचे वर्चस्व वाढविण्यास सांगितले होते. त्यातून गेल्या वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार करून तरुणाला जखमी केले होते. तसेच, एकावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये घायवळ टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. त्यातील काही गुंड अजूनही फरार आहेत. कोथरूड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस हवालदार लांडगे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संतोष धुमाळ हा पत्नीला भेटण्यासाठी कोथरूड गावठाण येथे येणार आहे. या बातमीची खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या टीम तयार करून कोथरूड गावठाण येथील गुलमोहर सोसायटीत पोहोचले. काही जण सोसायटीच्या आत व बाहेर जाणाऱ्या मार्गावर तसेच लिफ्टच्या ठिकाणी अधिकारी व अंमलदार थांबले. त्यानंतर एक पथक सोसायटीमधील फ्लॅट तपासू लागले. त्यावेळी एका फ्लॅटमधून आरोपी पळताना दिसला. तो खिडकीतून बाहेर पळण्याचा प्रयत्न करत असताना संतोष धुमाळ याला पकडण्यात आले.
संतोष धुमाळ याच्याकडे विपुल माझिरे याची चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की, विपुल माझिरे हा त्याला भेटण्यासाठी बालगंधर्व चौकातील जोशी वडेवाले या दुकानाच्या मागे येणार आहे. या माहितीनुसार पोलिसांनी जोशी वडेवाले यांच्या दुकानाच्या मागे सापळा रचला. काही वेळातच विपुल माझिरे संतोष धुमाळ याला भेटण्यासाठी आला. पोलिसांनी त्याला पकडून सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, सुनील कारोटे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले, पोलीस हवालदार लांडगे, पठाण, सोनावणे, दगडे, लोखंडे, पोलीस अंमलदार पांढरे, शिर्के, डोंगरे, जमदाडे यांनी केली आहे.
