आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाची दिशा अखेर बदलणार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 14, 2026
Spread the love

पुणे : गंगाधाम चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या दिशेबाबत ‘महाराष्ट्र न्यूज नेटवर्क’ने गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. मार्केट यार्डकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उड्डाणपूल याच मार्गावर उभारण्यात यावा, अशी भूमिका महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने सुरुवातीपासून सातत्याने मांडली होती. आता महापालिका प्रशासनानेही याच दिशेने निर्णय घेतल्याने परिसरातील नागरिकांकडून महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्याचे कौतुक होत आहे.

गंगाधाम चौक हा मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कोंढवा आणि परिसराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा वाहतूक दुवा आहे. या चौकात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उड्डाणपुलाची दिशा निश्चित करताना प्रत्यक्ष वाहतुकीचा प्रवाह आणि भविष्यातील गरजांचा विचार व्हावा, हा मुद्दा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने वारंवार उपस्थित केला.

महाराष्ट्र न्यूज नेटवर्कची सुरुवातीपासून स्पष्ट मागणी होती की, मार्केट यार्डकडून कोंढव्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल उभारल्यास सर्वाधिक वाहनचालकांना त्याचा फायदा होईल आणि गंगाधाम चौकातील वाहतूक कोंडी प्रभावीपणे कमी होईल.
मात्र, यापूर्वी उड्डाणपूल बिबवेवाडी–कोंढवा रस्त्याच्या दिशेने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय काही बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी तसेच स्थानिक राजकीय मतभेदातून घेतला जात असल्याचा मुद्दा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने आपल्या वृत्तमालिकेतून उपस्थित केला होता. या निर्णयामुळे सार्वजनिक निधी खर्च होऊनही मूळ वाहतूक समस्येवर अपेक्षित परिणाम होणार नाही, अशी भूमिकाही सातत्याने मांडण्यात आली.

मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवला विषय
या प्रश्नाला केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न ठेवता महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने यासंदर्भातील बातम्या आणि वस्तुस्थिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयानेही या प्रकरणाची दखल घेतली. उड्डाणपुलाच्या प्रस्तावित कामाची प्रत्यक्ष पाहणी आणि परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी मंत्रालयातील एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.
या घडामोडीनंतर प्रशासनाच्या पातळीवर उड्डाणपुलाची दिशा आणि त्याची उपयुक्तता याबाबत नव्याने विचार सुरू झाला.

आयुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी
दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे तसेच पथ व प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी गंगाधाम चौकाची पाहणी केली. वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष परिस्थिती आणि वाहनांचा प्रवाह लक्षात घेऊन प्रस्तावित उड्डाणपुलाची दिशा निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मार्केट यार्ड येथील पीएमपी डेपोकडून बिबवेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची दिशा आता बदलण्याचे निश्चित झाले आहे. गंगाधाम चौकातील डोंगर उताराकडून दोन नाले मार्केट यार्डच्या दिशेने येत असल्याने भुयारी मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर बिबवेवाडी–कोंढवा रस्त्यावरून एससीएमटीआर मार्गिकेचे नियोजन असल्याने उड्डाणपुलाच्या नव्या दिशेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
उड्डाणपुलाच्या निर्णयामुळे गंगाधाम चौकातील उताराच्या रस्त्यावर भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होऊ नये, याचाही प्रशासनाकडून विचार करण्यात येत आहे. प्रकल्पासाठी सुमारे दहा कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचेही वृत्त आहे.

दोन वर्षांच्या पाठपुराव्याची फलश्रुती
गंगाधाम चौकातील वाहतूक प्रश्न हा हजारो पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तिगत अथवा व्यावसायिक हितापेक्षा नागरिकांचे हित आणि प्रत्यक्ष वाहतुकीची गरज महत्त्वाची असल्याची भूमिका महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने गेल्या दोन वर्षांत सातत्याने घेतली.
आज प्रशासनाने उड्डाणपुलाची दिशा बदलण्याच्या दृष्टीने पावले उचलल्याने महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने मांडलेल्या मागणीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या वाहतूक समस्येला सातत्याने वाचा फोडणे, प्रशासनापासून राज्य शासनापर्यंत प्रश्न पोहोचवणे आणि निर्णय होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे, या पत्रकारितेच्या भूमिकेचे हे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.
“गंगाधाम चौकातील उड्डाणपूल योग्य दिशेने व्हावा आणि त्याचा सर्वाधिक फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळावा,” ही महाराष्ट्र न्यूज नेटवर्कची दोन वर्षांपासूनची मागणी आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.