बुधवार पेठेतील २ बांगलादेशी महिलांची सुटका
बांगलादेशी महिला व तिच्या पतीला अटक : अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटव
पुणे : अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने बुधवारी बुधवार पेठेतील सपना बिल्डिंगवर छापा टाकून २ बांगलादेशी तरुणींची सुटका केली. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या बांगलादेशी महिलेसह तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
शुली बेगम अफजल शेख ऊर्फ प्रिती रणजित पात्रा (वय ३९, रा. सपना बिल्डिंग, बुधवार पेठ, मूळ रा. सुबोडा, बांगलादेश), रणजित गदाधर पात्रा (वय ४२, रा. बुधवार पेठ, मूळ रा. बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस हवालदार वैशाली इंगळे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांना सपना बिल्डिंगमध्ये एक महिला व पुरुष वेश्या व्यवसायासाठी बांगलादेशी मुलींना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या अनुषंगाने बनावट ग्राहक तयार करण्यात आला. त्याला माहिती देऊन पाठविण्यात आले. बनावट ग्राहक तेथे गेल्यानंतर त्याने मेसेज पाठविला. त्यानंतर पोलिसांनी सपना बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावर छापा टाकला.
तेथे दोन महिला आढळून आल्या. पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यातील एका महिलेने सांगितले की, मी २ वर्षांपूर्वी बांगलादेशातून मैत्रीण बिल्कीस हिच्यासोबत पुण्यात आले.
दुसऱ्या महिलेने आपण मुंबईहून १५ दिवसांपूर्वी पुण्यात आल्याचे सांगितले. मुंबईतील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तिच्यावर बांगलादेशी असल्याबाबत कारवाई करण्यात आली होती.
दोघींकडे चौकशी केली असता, शुली बेगम शेख व तिचा पती रणजित पात्रा हे त्यांच्याकडून वेश्या व्यवसायाचे काम करवून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, अविनाश कोंडे, रेश्मा कंक, वैशाली इंगळे यांनी केली आहे.
