आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सहकारनगरमध्ये ४ पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे केली जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 14, 2026
Spread the love

पुणे : सहकारनगरमध्ये गुन्हे शाखेच्या युनिट २च्या पथकाने ५ सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून ४ पिस्तूल व ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

सुफियान बशीर शेख (वय २२, रा. जैन टॉवरसमोर, धनकवडी), निलेश प्रभुलिंग कुंभार (वय २१, रा. रजनी कॉर्नर, काकडे चाळ, बालाजीनगर), तुकाराम बाबासाहेब गवते (वय १९, रा. रजनी कॉर्नर, बालाजीनगर), ऋषभ ऊर्फ ऋषी शिवाजी भगत (वय २३, रा. त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ), अमित राजाराम पिलावरे (वय २५, रा. सुभेदार तालीमजवळ, शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट २चे पथक १३ ऑगस्ट रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. रेकॉर्डवरील आरोपी तपासत असताना पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे व उज्ज्वल मोकाशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सहकारनगर येथील वनशिव वस्ती येथे काही जण संशयितरीत्या थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्रे आहेत.

या मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी करून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ६१ हजार २०० रुपये किमतीची ४ पिस्तूल व ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्यापैकी काही जणांवर खून, खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे संरक्षणासाठी पिस्तूल बाळगल्याचे त्यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तेजश्री पवार, शिवानंद कायगुडे, उज्ज्वल मोकाशी, शंकर नेवसे, कुंदन शिंदे, नागनाथ राख, विनोद चव्हाण, संदीप शिर्के, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, ओमकार कुंभार, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार व विनायक वगारे यांनी केली आहे.