फ्लाईग जिप्सी कॅफेत पहाटे ४ वाजता पुन्हा राडा
कोयत्याने वार केल्याने तरुण गंभीर जखमी : डेक्कन जिमखाना पोलीस पुन्हा वादात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पहाटेपर्यंत सुरू असलेल्या डेक्कन जिमखान्यावरील शिरोळे रोड येथील फ्लाईग जिप्सी कॅफेमध्ये पुन्हा एकदा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता या कॅफेमध्ये एका टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. अथर्व जगताप (वय १९) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन जिमखान्यावरील शिरोळे रोडवर असलेले फ्लाईग जिप्सी कॅफे १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते.
तेथे अनेक तरुण-तरुणींची ये-जा सुरू होती. सोशल मीडियावरील रिल्सवरील लाइक आणि कमेंटवरून कॅफेमध्ये वाद झाला. त्यानंतर आतमधील तरुणांनी काही जणांना बोलावून घेतले.
दोन तरुणींसह ८ ते १० जण कॅफेमध्ये शिरले. यावेळी अथर्व जगताप यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेत अथर्व जगताप गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा डेक्कन पोलीस तपास करीत आहेत.
वादात सापडलेला फ्लाईग जिप्सी कॅफे – डेक्कन येथील शिरोळे रोडवरील फ्लाईग जिप्सी कॅफे हा नेहमीच वादाच्या केंद्रबिंदूवर राहिला आहे. फ्लाईग जिप्सी कॅफे पहाटेपर्यंत सुरू असल्याच्या वारंवार तक्रारी पोलिसांकडे येत असतात. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा उशिरापर्यंत कॅफे सुरू ठेवल्याबद्दल २०२५ मध्ये दोन खटले दाखल करण्यात आले होते. यावर्षी २०२६ मध्ये आतापर्यंत सहा खटले दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी फ्लाईग जिप्सी कॅफे उशिरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारवाईदरम्यान तेथील काऊंटरवरील कप पोलीस काठीने खाली पडल्याने पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांना २९ जून २०२६ रोजी निलंबित करण्यात आले होते. या घटनेची सत्यता तपासल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते या परिसरातील सर्व हॉटेल आणि कॅफे रात्री उशिरा बंद होतात. मात्र, फ्लाईग जिप्सी कॅफे सुरू असल्याने पहाटेपर्यंत तेथे मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते.
