स्कॉर्पिओसाठी वाहन कर्ज घेऊन फसवणूक
धन्वंतरी नागरी पतसंस्थेला घातला १० लाखांचा गंडा : सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार खरेदी करण्यासाठी सह्याद्री मोटर्स येथून खरेदीसाठी कर्ज मागणी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे १० लाख ५० हजार रुपयांचे वाहन कर्ज घेऊन पतसंस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विजय भगवान शिर्के (वय ४५, रा. पार्थ दर्शन सोसायटी, आंबेगाव) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी स्वप्नील हनुमंत लिपाणे (रा. टेल्को सोसायटी, जांभुळवाडी रोड, दत्तनगर, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धन्वंतरी पतसंस्थेच्या धनकवडी शाखेमध्ये १ जानेवारी २०१९ ते ८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील लिपाणे याने धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेत महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ सह्याद्री मोटर्स येथून खरेदी करण्यासाठी कर्ज मागणी अर्ज केला. अर्जासोबत पतसंस्थेला फसविण्याच्या उद्देशाने सह्याद्री मोटर्सचे इनव्हॉइस, इन्श्युरन्स पॉलिसी इत्यादी बनावट कागदपत्रे तयार केली.
संस्थेची दिशाभूल करून त्या आधारे १० लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यानंतर सह्याद्री मोटर्स या बनावट नावाने आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत खाते उघडून त्या खात्यात रक्कम जमा केली. १० लाख ५० हजार रुपयांचे कर्ज व त्यावरील व्याज न भरता संस्थेची दिशाभूल करून फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे तपास करीत आहेत.
