सराईत वाहन चोराला पकडून १९ मोटारसायकली जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, बारामती तालुका पोलिसांची कामगिरी : १३ बुलेटचा समावेश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बारामती शहर व तालुक्यातून प्रामुख्याने बुलेट गाड्या चोरणाऱ्या सराईत वाहन चोराला पकडून त्याच्याकडून बारामती तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही फलटण, बारामती, शिरूर परिसरात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
बारामती शहर तसेच तालुका परिसरातून बुलेट चोरीच्या घटना वाढलेल्या दिसून आल्या होत्या. त्यावरून पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या.
बुलेट चोरीला गेलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन, त्या आधारे शोध सुरू केला. त्यात एका निळ्या रंगाच्या ज्युपिटरवरून चोरटा येतो व बुलेट चोरून नेत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलीस पथके शोध घेत असताना गस्त घालणाऱ्या पोलिसांना एक संशयित चोरीची मोटारसायकल घेऊन पेन्सिल चौकाकडून मेडिकल कॉलेजकडे जाताना दिसला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. समाधान काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने रात्रीच्या वेळी बुलेट चोरून नेत असल्याची कबुली दिली.
तो एकटाच व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या बुलेट व इतर मोटारसायकली चोरी करत असे. चोरी केलेल्या वाहनांवर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा, एसटी महामंडळ असे लोगो लावून चोरी केलेल्या मोटारसायकलींचा वापर करून पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली त्याने दिली. त्याने फलटणमधील एका गोदामात लपवून ठेवलेल्या १९ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. त्यात १३ बुलेटचा समावेश आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे, बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अभिजित एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे, विठ्ठल तरंगे यांनी केली आहे.
एसआरपीएफच्या टेक्निकल विंगचा भगोडा – समाधान काळे हा एसआरपीएफच्या टेक्निकल विंगमध्ये काही काळ नोकरीला होता. तेथून एक महिन्यापूर्वी तो भगोडा होऊन पळून आला आहे. या ठिकाणी नोकरीला लागण्यापूर्वी त्याच्यावर वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो ज्युपिटर गाडी बारामती स्टँडवर लावायचा. त्यानंतर तो मोटारसायकल चोरून नेत असे. ती फलटणमधील एका गोदामात लपवून ठेवत होता.
