वर्धमानपुरा सोसायटीची डिजिटल झेप; ३३५ सदनिकांचे रेकॉर्ड होणार डिजिटल
स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘डिजिटल प्रॉपर्टी रेकॉर्ड व डिजिटल प्रमाणपत्र’ उपक्रमाचा शुभारंभ
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुण्यातील ३३५ सदनिका असलेल्या वर्धमानपुरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने डिजिटल, सुरक्षित आणि भविष्यासाठी सज्ज सोसायटीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सोसायटीतील प्रत्येक सदनिकेशी संबंधित महत्त्वाची माहिती व रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी ‘डिजिटल प्रॉपर्टी रेकॉर्ड व डिजिटल प्रमाणपत्र’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी प्रसिद्ध समाजसेवक व पुण्यभूषण फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. सतीश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सोसायटीच्या चारही इमारतींमधील प्रातिनिधिक सभासदांना पहिले डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सभासदांच्या सदनिकेशी संबंधित रेकॉर्ड स्वतंत्र डिजिटल प्रणालीमध्ये संकलित करून त्याच माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध करून देणारी वर्धमानपुरा ही पुण्यातील पहिली हाऊसिंग सोसायटी असल्याचा दावा सोसायटीने केला आहे. या प्रमाणपत्रात फ्लॅट क्रमांक, इमारतीची माहिती, शेअर सर्टिफिकेट क्रमांक, खरेदीखत/विक्रीखत क्रमांक व उपलब्ध तपशील, पार्किंग क्रमांक, पुणे महानगरपालिकेचा मालमत्ता कर ग्राहक क्रमांक, महावितरण व एमएनजीएल ग्राहक क्रमांक तसेच इतर उपलब्ध महत्त्वाची माहिती एकत्रित केली जाणार आहे.
यामुळे सभासदांना विविध कागदपत्रे किंवा ग्राहक क्रमांक स्वतंत्रपणे शोधण्याची गरज राहणार नाही. सोसायटीच्या उपलब्ध रेकॉर्डच्या आधारे प्रत्येक फ्लॅटची स्वतंत्र डिजिटल नोंद तयार केली जाणार आहे.
हा उपक्रम सोसायटीचे चेअरमन हर्षद लोढा यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. जुने व महत्त्वाचे रेकॉर्ड भविष्यात सहज उपलब्ध व्हावेत आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहावेत, हा यामागील उद्देश आहे.
ही डिजिटल प्रणाली हर्षद लोढा यांचे सुपुत्र आयुष हर्षद लोढा यांनी त्यांच्या ‘ब्लॅक रिज’ कंपनीच्या माध्यमातून विकसित केली आहे. सोसायटीची गरज आणि कार्यपद्धती समजून घेतल्यानंतर प्रणालीची प्राथमिक रचना त्यांनी अवघ्या चार तासांत तयार केली. यापूर्वीही त्यांनी विविध कंपन्यांसाठी डिजिटल प्रणाली विकसित केल्या आहेत.
या प्रणालीमुळे सोसायटीचे जुने रेकॉर्ड, सदनिकांशी संबंधित कागदपत्रे, सभासदांची नोंद तसेच सरकारी व युटिलिटी संस्थांशी संबंधित माहिती अधिक व्यवस्थित व सुरक्षितपणे जतन करता येणार आहे. भविष्यात फ्लॅटची कागदपत्रे, सोसायटीचा इतिहास आणि सदनिकेशी संबंधित माहिती शोधणेही सोपे होणार आहे.
माहितीची सुरक्षितता व गोपनीयतेला विशेष महत्त्व देण्यात आले असून, रेकॉर्डवर सोसायटीचे नियंत्रण राहणार आहे. सभासदांच्या वैयक्तिक व मालमत्तेशी संबंधित माहितीचा अनधिकृत वापर किंवा प्रसार होऊ नये, यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आयुष लोढा यांनी सांगितले की, हा केवळ कागदपत्रांच्या डिजिटलायझेशनचा प्रकल्प नसून वर्धमानपुरा सोसायटीसाठी ‘सुरक्षित डिजिटल वारसा’ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात प्रणालीमध्ये आणखी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
‘डिजिटल वर्धमानपुरा – सुरक्षित रेकॉर्ड – भविष्यासाठी सज्ज सोसायटी’ या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम पुण्यातील इतर हाऊसिंग सोसायट्यांसाठीही डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापनाची नवी दिशा ठरण्याची शक्यता आहे.
