बार्शीच्या सुनेची MPSC मध्ये बाजी; भूमिका कानडे दुय्यम निबंधकपदी
मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावरून श्रेणी-१ पदापर्यंत झेप
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या निकालात बार्शीच्या यशाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. बार्शीचे सुपुत्र ऋतिक आगरकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याचबरोबर बार्शीच्या सुनेनेही MPSC परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले असून, भूमिका विशाल कानडे यांची दुय्यम निबंधक, श्रेणी-१ या पदावर निवड झाली आहे.
भूमिका कानडे यांचे माहेर सोलापूर असून सासर बार्शी आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाचा आनंद माहेर आणि सासर अशा दोन्ही कुटुंबांतून व्यक्त होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भूमिका यांनी सोलापूर येथील एन. के. ऑर्चिड इंजिनिअरिंग कॉलेजमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. सध्या त्या मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मात्र, शासकीय सेवेत कार्यरत असतानाही वरिष्ठ पदावर काम करण्याचे ध्येय त्यांनी कायम ठेवले. नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली.
सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC परीक्षेच्या निकालात दुय्यम निबंधक, श्रेणी-१ या पदावर यश संपादन केले.
भूमिका यांचे पती विशाल कानडे हे सिव्हिल इंजिनिअर असून बार्शी सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे सदस्य आहेत. भूमिका यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बार्शी सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने भूमिका कानडे तसेच कानडे कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यात आले.
भूमिका कानडे यांच्या या यशामुळे नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल बार्शी आणि सोलापूर परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
