आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ज्येष्ठ महिलेवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 17, 2026
Spread the love

पुणे : नातेवाईक असलेल्या व्यक्तीने व्यवसायासाठी ज्येष्ठ महिलेकडे १ लाख रुपये मागितले. त्यांनी नकार दिल्याच्या रागातून चाकूने हात, मनगट आणि गळ्यावर वार करून ज्येष्ठ महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या आरोपीने कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने ओढून काढल्याने कानाला दुखापत झाली. तसेच घरातील साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

दिनेश जुगराज सुराणा (वय ५८, रा. गंगाधाम फेज १, गंगाधाम) आणि फर्मान मन्सूर पारकर (वय २८, रा. सारा क्रिस्टल, मलिकनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत गुणवंती सुरेश सुराणा (वय ६६, रा. पंचरत्न बिल्डिंग, एकबोटे कॉलनी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान सुराणा यांच्या पंचरत्न बिल्डिंग येथील घरी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुणवंती सुराणा यांचा दिनेश सुराणा हा नातेवाईक आहे. तो फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने व्यवसायासाठी १ लाख रुपये मागितले.

मात्र, फिर्यादी यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून दिनेश सुराणा याने खिशातील चाकू काढून फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि गळ्यावर वार केले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

तसेच, त्याच्याकडील कामगार फर्मान पारकर याने फिर्यादी यांच्या डाव्या कानातील ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल जबरदस्तीने ओढून काढले.

त्यामुळे त्यांच्या कानाला दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्या घरातील साडेपाच लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. फिर्यादी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खडक पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल वळसंग तपास करीत आहेत.