घरातून बेकायदेशीर सव्वा लाखांचा दारूचा साठा जप्त
सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द येथील घटना : गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरामध्ये बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने हिंगणे खुर्द येथील साईनगरमधील घरावर छापा टाकून १ लाख २४ हजार ६३५ रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. बेकायदा मद्यविक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
अंकितकुमार सूरजन बिंद (वय २०, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) आणि आदित्य राजू शिंदे (रा. शंकर मंदिराजवळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक सिंहगड रोड भागात गस्त घालत होते. त्या वेळी हिंगणे खुर्दमधील साईनगर परिसरात राहणाऱ्या अंकितकुमार बिंद याने घरात बेकायदा मद्याचा साठा करून ठेवला असून, तो मद्याच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे आणि काटकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. बिंद याच्या घरातून १ लाख २४ हजार रुपयांच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. बिंद याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने मित्र शिंदे याने मद्याच्या बाटल्या विक्रीसाठी दिल्याची माहिती दिली. दोघे बेकायदा मद्यविक्रीचा भागीदारीत व्यवसाय करत होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांना सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, काटकर, राजेंद्र नलावडे, वाघमारे, किशोर शिंदे, लिम्हण, जगदाळे, बोंडरे, पुरुषोत्तम गुन्ला, झेंडे आणि राठोड यांनी केली.
