आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सिंहगडावर मारहाण करणाऱ्या समस्त हिंदू बांधव आर्मीच्या ८ जणांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 17, 2026
Spread the love

पुणे : ८ वर्षांच्या मुलीने अजय देवगण यांचा ‘तानाजी’ हा चित्रपट पाहिला होता. तिने सिंहगड किल्ला व तानाजींचा पुतळा पाहण्याचा हट्ट केला. त्यामुळे या मुलीला घेऊन एक कुटुंब सिंहगडावर आले होते. या मुलीने बरमुडा घातला असल्याच्या कारणावरून तिच्या वडिलांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगडावर फिरायला आलेल्या तरुण-तरुणींना मारहाण करणे, त्यांना उठाबशा काढायला लावून दहशत निर्माण करणाऱ्या समस्त हिंदू बांधव आर्मीच्या ८ जणांवर हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संकेत संजय पाटील, आशिष दिलीप अपार, रेवण नारायण कोकाटे, सायली सुजीत चव्हाण, केतकी सूरज जाधव, अमर रामचंद्र शिर्के, कुणाल किसन नलावडे, आर्या प्रविण कवडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अवधुत पांडुरंग पाटील (वय ३९, रा. व्यंकटेश सेरेनिटी, धायरी) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड किल्ल्यावर रविवारी दुपारी २ ते ५ या वेळेत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपली पत्नी, मुलगा, पुतण्या अर्णव पाटील तसेच त्यांचे मित्र जोसेफ डिसोझा (रा. मांजरी) यांच्यासोबत सिंहगडावर गेले होते. त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी सर्वांनी भेट दिली. फोटो काढले. तेथून पुढे जात असताना तेथे समस्त हिंदू बांधव आर्मी (एसएचबी आर्मी) चे ७ ते ८ जण तरुण-तरुणी आले. ‘आम्हाला बरमुडा घालून का आलात? येथे फोटो का काढता? खाली जा,’ असे ते म्हणाले.

तेव्हा फिर्यादी यांनी, ‘आम्ही जात आहोत, आता तुम्ही आम्हाला मारणार आहात का?’ असे म्हटले. त्यावेळी त्यातील तिघे जण पुढे झाले. त्यांनी फिर्यादी यांच्या गालावर चापट मारून मारहाण केली. एका तरुणीने त्यांच्या पत्नीचा हात पकडून लोकांच्या गर्दीत ओढत नेले. त्यावेळी त्यांनी, ‘तुम्हाला हिंदू संस्कृती समजत का नाही?’ असे बोलून दमदाटी केली.

त्यावेळी फिर्यादी हे खाली उतरत असताना पोलिसांची गाडी आली. त्यांनी हात दाखवून गाडी थांबविली. सहायक पोलीस निरीक्षक व इतर पोलिसांना त्यांनी एसएचबी आर्मीच्या मुलांनी आमच्यासोबत मारहाण केल्याचे सांगितले. त्यांनी, ‘तुम्ही पोलीस ठाण्यात जा, आम्ही सर्वांना घेऊन खाली येतो,’ असे सांगितले.

ते सर्व पोलीस ठाण्यात आले. तेथे खुशबू मिनानाथ बदावणे, करिश्मा मिनानाथ बदावणे, विशाल मनोहर खंडागळे, आदर्श दशरथराव ढेकाळे (रा. अमरावती) यांनाही या आर्मीच्या तरुण-तरुणींनी मारहाण केल्याचे सांगितले.

हवेली पोलिसांनी या तरुण-तरुणींना पकडून आणले. फिर्यादी व विशाल खंडागळे यांना संकेत पाटील, अमर शिर्के, कुणाल नलावडे यांनी मारहाण केली होती. त्यांच्या पत्नीला आर्या कवडे हिने हाताने ओढले होते. खुशबू बदावणे हिला सायली चव्हाण आणि केतकी जाधव यांनी मारहाण केली होती. त्या सर्वांनी मारहाण करणाऱ्यांना ओळखले. पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

संस्कृती रक्षणाच्या नावाखाली दहशत
याबाबत अवधुत साळुंखे यांनी सोशल मीडियावर सांगितले की, आमच्यासोबत असलेल्या कुटुंबातील एका ८ वर्षांच्या मुलीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील अजय देवगण यांचा ‘तानाजी’ चित्रपट पाहिला होता. तिला सिंहगड किल्ला व तानाजी मालुसरे यांचा पुतळा पाहण्याचा हट्ट केला होता. आम्ही सिंहगडावर अचानक जाण्याचे ठरवले. या ८ वर्षांच्या मुलीने बरमुडा घातला होता. त्यावर या संस्कृती रक्षणाचा दावा करणाऱ्या तरुण-तरुणींनी आक्षेप घेतला. पंजाबी ड्रेस घातलेल्या महिलेला ओढत गर्दीत नेले. हिंदू संस्कृती शिकविणाऱ्या या तरुणीने स्वतः मात्र ट्रॅक पँट व टी-शर्ट घातला होता. अशा संघटनांनी हिंदू संस्कृतीच्या नावाखाली दहशत माजवू नये, असे त्यांनी आवाहन केले आहे.