आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शी पोलिसांची नाकाबंदी; गावठी पिस्तूल, तलवार अन् चाकूसह सराईत ताब्यात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 17, 2026
Spread the love

बार्शी : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या आदेशानुसार बार्शी शहरात सुरू असलेल्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान बार्शी शहर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरुद्ध मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका सराईत आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, लोखंडी तलवार, धारदार चाकू तसेच स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपीचा तडीपार कालावधी नुकताच संपला होता.

११ ऑगस्टच्या रात्री ते १२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेपर्यंत बार्शी शहरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी सुरू होती. यावेळी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुभाषनगर येथील हिरामठ हॉस्पिटल परिसरात एक संशयित इसम स्विफ्ट डिझायर कारमध्ये बसला असून त्याने कमरेला पिस्तूल लावले आहे. त्याच्यासोबत आणखी दोन इसम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांचे वाहन दिसताच कारमधील दोन इसमांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी कारमधील एका इसमाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह, लोखंडी तलवार व धारदार चाकू आढळून आला.

या प्रकरणी सचिन कुमार मिरगणे (वय ३८, रा. सुभाषनगर, बार्शी) याला अटक करण्यात आली आहे. मिरगणे याचा तडीपार कालावधी नुकताच संपला होता. तर त्याच्यासोबत असलेले राहुल अनभुले व दत्ता उंदरे (दोघेही रा. बार्शी) हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह, ४ हजार रुपये किमतीची लोखंडी तलवार, १ हजार रुपये किमतीचा धारदार चाकू आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच १४ ईपी ८४०२) असा एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर शस्त्रे बाळगण्यासाठी आरोपीकडे कोणताही परवाना नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांच्या शस्त्रविषयक जमावबंदी व निर्बंध आदेशाचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) अन्वये उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

पोलीस कॉन्स्टेबल अजिज मनसुब शेख (नेमणूक : बार्शी शहर पोलीस ठाणे) यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, ४ व २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील धनवे, पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे, सहायक पोलीस फौजदार अजित वरपे, सूर्यकांत मगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण साठे, सुनील बनसोडे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शबाना कोतवाल, सागर सुरवसे, सचिन देशमुख, अजिज शेख, अंकुश जाधव, दत्ता सोमवाड, अविनाश पवार, राहुल उदार, प्रल्हाद अकुलवार, सचिन नितनात, सतीश उघडे, सचिन राऊत, चालक पोलीस कॉन्स्टेबल मस्के आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल चेतन झाडे यांचा समावेश होता.

शहरात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर शस्त्रे, संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली किंवा गैरप्रकार आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन बार्शी शहर पोलिसांनी केले आहे.