खुनाचा प्रयत्न करून ५ महिने फरार गुंड जेरबंद
पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केला होता दोघांना मारण्याचा प्रयत्न : गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : धनकवडीत पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर टोळक्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यातील तब्बल ५ महिन्यांपासून फरार असलेल्या एका गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने पकडले आहे.
सोहम ऊर्फ सोन्या मनोहर थोरात (वय २१, रा. जाधवनगर, वडगाव, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत दीपक महादेव घोडके (वय ४३, रा. शांतीनगर वसाहत, धनकवडी) यांनी फिर्याद दिली होती.
या घटनेत दीपक घोडके व त्यांचा भाचा नीलेश अर्जुन तावरे (वय ३५, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) हे गंभीर जखमी झाले होते.
ही घटना धनकवडीतील शंकर महाराज पुलासमोर ३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती. फिर्यादी आणि त्यांचा भाचा नीलेश तावरे यांनी उड्डाणपुलाखाली वडापावचा गाडा लावला होता.
तेथे अनिल साळुंखे, निलेश शेंडगे, बालाजी शेंडगे आणि दिनेश शेंडगे हे आले. त्यांनी पूर्वीच्या भांडणातून दोघांच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यातील सोहम थोरात हा फरार झाला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक रविवारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, विजय पवार आणि उज्वल मोकाशी यांना सोहम थोरात हा कात्रज चौक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना याबाबत कळविले. कात्रज चौक परिसरात शोध घेतल्यानंतर सोहम थोरात याला पकडण्यात आले. अधिक तपासासाठी त्याला सहकारनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, सजेर्राव सरगर, विजय पवार, संदिप शिर्के, विद्या शिंदे, योगेश मांढरे, शिवानंद कायगुडे, शंकर कुंभार, आशिष यादव आणि विनायक वगारे यांनी केली आहे.
