आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणाने स्वतःच्याच अपहरणाचा रचला कट

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 18, 2026
Spread the love

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरून आपले अपहरण झाले असून आपल्याला सोडण्यासाठी ५ लाख रुपये मागत असल्याचा रडत असलेल्या भावाचा व्हिडिओ पाहून उत्तर प्रदेशातील कुटुंब हादरले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही माहिती पुणे पोलिसांना दिली. पुणे रेल्वे स्टेशनवरून अपहरण झाल्याचे समजल्याने गुन्हे शाखेसह पोलीस उपायुक्तांपासून बंडगार्डन पोलीस सतर्क झाले. तांत्रिक विश्लेषणातून हा तरुण खडकी येथे असल्याचे समजले. तेथील लॉजवर शोध घेतल्यावर तो एकटाच तेथे राहत असल्याचे दिसून आले. चौकशीमध्ये त्याने भावाकडून पैसे मिळविण्यासाठी स्वतःच अपहरणाचे नाट्य रंगवले. ते खरे वाटावे म्हणून रडत असल्याचा व्हिडिओ तयार करून घरी पाठविल्याचे उघड झाले.

ओम प्रकाश गौरीशंकर (वय १९, रा. जाललपूर, ता. बेबेरु, जि. बांदा, उत्तर प्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. तो नुकताच पुण्यात आला होता. त्याला काही कामधंदा नसल्याने खर्चासाठी पैसे नव्हते. अनेकदा त्याने गावाकडील घरातून पैसे मागितले होते. परंतु, ते कमी पडत होते. त्यावर त्याने एक शक्कल लढविली.

त्याने उत्तर प्रदेशात राहणाऱ्या आपल्या भावाला आपल्याला किडनॅप केले असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास बसावा यासाठी ढसाढसा रडत असलेला व्हिडिओ भावाला पाठविला. तसेच सुखरूप सुटका करायची असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. या प्रकाराने गौरीशंकरचे कुटुंब घाबरून गेले. त्यांनी शाहजहांपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. उत्तर प्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचे पुणे रेल्वे स्टेशनवरून अपहरण झाले असल्याचे सांगितले. अपहरण झालेल्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक पोलिसांना पाठविला.

बंडगार्डन पोलिसांनी रविवारी मध्यरात्री शोधाशोध सुरू केली. या तरुणाच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर तो खडकी येथे असल्याचे दिसून आले. सर्व पोलीस पथक खडकीत शोध घेऊ लागले. खडकी भागातील क्राऊन प्लाझा लॉज येथे त्याचे लोकेशन दिसून येत होते. पहाटेच्या सुमारास पोलीस लॉजमध्ये पोहोचले. तेव्हा गौरीशंकर हा एकटाच लॉजमधील खोलीमध्ये असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी गौरीशंकर याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपणच आपल्या भावाला आपले अपहरण झाल्याचा व्हिडिओ पाठविल्याची कबुली दिली. त्याच्या या कृत्यामुळे पोलीस मात्र रात्रभर शोधमोहिमेत अडकले होते. बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.