आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विदेशी दारूच्या बाटल्या चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 18, 2026
Spread the love

पुणे : कल्याणीनगर येथील टॉनिक आउटलेट या दुकानातून दारूच्या बाटल्या चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

रोहन राम कांबळे (वय २८, रा. प्रिस्टिन सिटी, बकोरी गाव, ता. हवेली) आणि अमित महादेव सीतापुरे (वय २७, रा. सिद्धार्थनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश चव्हाण यांचे कल्याणीनगर येथे दारूचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातून दारूच्या बाटल्या चोरीला गेल्या होत्या. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, २ आणि ७ ऑगस्ट रोजी दोघे जण येथे रेंगाळत असल्याचे दिसून आले. त्यांच्या फिर्यादीनुसार, आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरे सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आले होते.

पोलीस अंमलदार संदीप जायभाय यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जीएसटी कार्यालयाजवळ दोघे जण संशयास्पदरीत्या थांबले असून, त्यांच्याकडे चोरीचे साहित्य असण्याची शक्यता आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलीस पथक तेथे पोहोचले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, त्यांनी विदेशी दारूच्या बाटल्या चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून २७ हजार २०० रुपयांच्या ६ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते आणि पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार मुकुंद कोकणे, पोलीस अंमलदार बालाजी सोगे, संदीप जायभाय, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, शैलेश वाबळे, नटराज सुतार आणि सोमनाथ गायकवाड यांनी केली आहे.