व्हॅलेंटिना मेगा कॉर्प कंपनीचे ८२ कोटी ४० लाख रुपये जप्त
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश : देशातील पहिलीच कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या व्हॅलेंटिना मेगा कॉर्प या कंपनीची ८२ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला आहे. अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ च्या कलमाखाली ही कारवाई करण्यात आली असून, देशातील ही पहिलीच कारवाई आहे.
व्हॅलेंटिना मेगा कॉर्प एलएलपी कंपनीने लोकांकडून गुंतवणूक स्वीकारून त्यांना कागदोपत्री १ टक्का परतावा देण्याचे आणि प्रत्यक्ष ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल ४३ कोटींच्या ठेवी स्वीकारल्या आहेत.
त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने जवळपास अनेक महिने गुप्तपणे तपास करून हा घोटाळा समोर आणला आहे. याप्रकरणी १८ एप्रिल २०२६ रोजी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
त्यात कंपनीचे संचालक संतोष नाथा बांदल (रा. सॅलसबरी पार्क), ज्ञानेश्वर अनंत चोरगे (रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमारे २ हजार ८०० लोकांची सुमारे ४३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या लोकांनी कंपनीत ठेवी ठेवलेल्या नसून, ते कंपनीचे भागीदार असून त्यांनी त्यांची रक्कम गुंतवली असल्याचा कंपनीकडून दावा केला जात आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही कंपनीच्या संचालकांनी लोकांना आश्वस्त केले आहे की, तुम्हाला तुमचे पैसे परत केले जातील. त्यामुळे गुंतवणूकदारांना अजूनही वाटत आहे की, कंपनी आपले पैसे परत करेल. त्यामुळे ते तक्रार करण्यासाठी पुढे आलेले नाहीत.
व्हॅलेंटिना मेगाकॉर्प कंपनीच्या भागीदारांनी भरघोस परताव्याच्या वचनावर ठेवीदारांकडून बेकायदेशीर अनियंत्रित ठेवी घेतल्या आहेत. परंतु, त्यांचा कोणताही फायदेशीर व्यवसाय नाही.
दरवेळी नवीन गुंतवणूकदारांना संस्थेमध्ये समाविष्ट करून जुन्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यात येत आहे. कंपनी अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ च्या कलम ३चे उल्लंघन करून अनियंत्रित ठेवी स्वीकारत आहे. त्यामुळे भविष्यात या संस्थेद्वारे ठेवीदारांच्या अनियंत्रित ठेवी परत करण्याची शक्यता दिसून येत नाही.
या कंपनीत जमा केलेल्या अनियंत्रित ठेवींमधून त्यांच्या स्वतःच्या अथवा अन्य व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या नावे रक्कम व अन्य मालमत्ता संपादित करण्यात आली असल्याचे निष्पन्न होत असल्याने, या संस्थेतील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अशा गुन्ह्यातून मिळवलेली रक्कम अंतरिम जप्त करणे व अशा जप्त रकमा सुरक्षित ठेवणे आवश्यक वाटते.
त्यामुळे व्हॅलेंटिना मेगा कॉर्प या कर्वेनगरमधील सक्सेस टॉवर येथे कार्यालय असलेल्या कंपनीच्या विविध बँक खात्यांतील ८२ कोटी ४० लाख ६१ हजार २६० रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
काय आहे अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध कायदा – हा सर्वसामान्यांच्या कष्टाची कमाई फसव्या आणि अनधिकृत आर्थिक योजनांपासून वाचवण्यासाठी भारत सरकारने तयार केलेला कडक कायदा आहे. हा कायदा बेकायदेशीर ठेव योजना चालवण्यास, त्यांची जाहिरात करण्यास आणि लोकांची फसवणूक करण्यास पूर्णपणे प्रतिबंधित करतो.
एमपीआयडी (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम) अॅक्टनुसार गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा दिला नसेल, त्यांची फसवणूक झाली असेल आणि त्यांनी तक्रार केली असेल, तर त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. परंतु, अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ नुसार कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय किंवा नियमांशिवाय चालवल्या जाणाऱ्या सर्व अनियंत्रित ठेव योजनांवर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस सुमोटो कारवाई करू शकतात.
