आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जुन्नरमध्ये नसरापूरची पुनरावृत्ती

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 19, 2026
Spread the love

पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खुन करण्याची नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती जुन्नरमध्ये घडली आहे. एका २५ वर्षाच्या नराधमाने १० वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी गावात ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारनंतर घडली आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

आमदार शरद सोनवणे यांच्या गावातच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. साहिल ऊर्फ पांग्या संपत खैरे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे.

घराशेजारी राहणार्‍या या नराधमाने ओळखीच्या या मुलीला सायकलवरुन शेतात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा दाबुन हत्या केली.

दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर तिचा शोध सुरु झाला. तिच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दिली.

ही मुलगी चौथीच्या वर्गात शिकत होती. ती आजारी असल्याने मंगळवारी शाळेत गेली नव्हती. तिचे आई वडिल घराबाहेर गेले होते. मुलगी न सापडल्याने तिचे आईवडिल व इतर गावकरी तिचा शोध घेत होते.

आरोपी सुद्धा मुलीचा शोध घेत असल्याचे नाटक करत होता. पोलिसांना संशय आल्यावर त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. पोलीस खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या मुलीचा मृतदेह गावातील ओढ्याजवळ एका झाडाखाली आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली.

या प्रकारामुळे पिंपळवंडी गावकरी संतप्त झाले होते. त्यांनी आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.