आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फ्लाईग जिप्सी हॉटेलमालक, मॅनेजरला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 19, 2026
Spread the love

पुणे : डेक्कन जिमखान्यावरील शिरोळे रोडवरील फ्लाईग जिप्सी हॉटेलचे मालक व मॅनेजर यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. रीलस्टार अथर्व जगताप याच्यावर खुनी हल्ला झाल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये सांडलेले रक्ताचे डाग धुवून टाकून पुरावा नष्ट केला होता.

हॉटेल मालक हेमंत पाटील (वय ४२, रा. धायरी) आणि हॉटेल मॅनेजर प्रेम पाटील (वय २३, रा. फ्लाईग जिप्सी हॉटेल, शिरोळे रोड, मूळ रा. ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हॉटेल फ्लाईग जिप्सी येथे पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रीलस्टार अथर्व जगताप याच्यावर हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेत डेक्कन पोलिसांनी माधवी कुंभारसह ७ जणांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. या घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये रक्त सांडलेले होते.

हे रक्ताचे डाग हॉटेल मालक हेमंत पाटील व प्रेम पाटील यांनी तातडीने धुवून टाकले. त्यामुळे पोलीस तपासात अडथळा आला असून, पुरावा नष्ट केल्याचा आरोप या दोघांवर पोलिसांनी ठेवला आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी याबाबत कडक कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना अटक केली आहे.

बंगल्याच्या आवारात हॉटेल सुरू करून महापालिकेच्या नियमावलीचे उल्लंघन करणे, तसेच मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याबाबत हॉटेलवर पोलिसांनी अनेक खटलेही दाखल केले आहेत.

नियमबाह्य पद्धतीने कॅफे सुरू ठेवल्यामुळे पुणे महापालिकेने आणि पोलिसांनी या कॅफेला सील ठोकले आहे.