आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेसह तरुणांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 19, 2026
Spread the love

पुणे : महसूल खाते, सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ससून रुग्णालयात त्यांची मेडिकल करून बनावट नियुक्ती पत्रे देत एका महिलेसह ५ तरुणांची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सूर्यकांत विठ्ठल सपकाळ (वय ४६, रा. सेवाधाम हॉस्पिटलशेजारी, तळेगाव दाभाडे), योगेश अदिकराव पाटील (वय ४२, रा. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ४५ वर्षांच्या महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पर्वती भागात राहत असून सामाजिक कार्य करतात. त्यांच्या पतीचे २०१७ मध्ये निधन झाले. सामाजिक कार्य करीत असताना त्यांची सूर्यकांत सपकाळ याच्याशी एप्रिल २०२० मध्ये ओळख झाली. त्याने आपण महसूल खात्यामध्ये अधिकारी पदावर असून मंत्रालयामध्ये आपली ओळख आहे. आपण बिझनेस डेव्हलपमेंटसंदर्भात मार्गदर्शन करतो. तसेच रहाटणी येथे आपले कार्यालय असल्याचे त्याने सांगितले.

त्याने महसूल, रेल्वे खाते व इतर सरकारी खात्यांमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देऊ शकतो. कोणाला आवश्यकता असल्यास सांगा, असे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी ‘मला नोकरी मिळेल का?’ असे विचारले. महसूल खात्यामध्ये शिपाई पदावर नोकरी लावून देतो, असे सांगून त्यासाठी ५ लाख रुपये लागतील, असे त्याने सांगितले. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याने शिपाई पदासाठी २ लाख रुपये आगाऊ रोख आणि कागदपत्रे घरी येऊन घेऊन गेला.

त्यानंतर त्याने इतरांकडूनही प्रत्येकी २ लाख रुपये घेतले. त्यांना मेडिकलसाठी समाजकल्याण आयुक्तालयाची सही व शिक्का असलेले पत्र पोर्टरद्वारे घरी पाठविले. त्यांची ससून रुग्णालयात मेडिकल करून घेण्यात आली. समाजकल्याण खात्याचे पत्र व ससूनमध्ये मेडिकल झाल्याने त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला.

काही जणांना उत्पादन शुल्क विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीसाठी प्रत्येकी ७ लाख रुपये मागितले. त्याने तरुणांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाची सही असलेले ज्युनिअर इंजिनिअर पदाचे नियुक्तीपत्र, तसेच एकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाची सही असलेले लिपिक पदाचे नियुक्तीपत्र पाठविले.

या तरुणांना हे नियुक्तीपत्र व मूळ कागदपत्रे घेऊन ८ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याला देण्यास सांगितले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर तेथे योगेश पाटील येऊन भेटला. त्याने नियुक्तीपत्र व इतर कागदपत्रे त्यांच्याकडून घेऊन एका महिन्यात नियुक्तीचे काम होईल, असे सांगितले.

त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी नियुक्तीबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्याने धनादेश दिला. तो बँकेत भरल्यानंतर बाऊन्स झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर करीत आहेत.