आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून १७ वर्षांच्या युवकाचा खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 20, 2026
Spread the love

पुणे : आपण एकाच वस्तीत राहणारे असताना ते आम्हाला मारहाण करून जेलमध्ये गेले, तरी तू त्यांचे स्टेटस का ठेवतोस, या कारणावरून दोघा अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षांच्या युवकाच्या डोक्यात हातोडीने वार करून त्याचा निर्घृण खून केला. कोथरूड येथील एआरएआय टेकडीवरील जंगलात मंगळवारी रात्री ही घटना घडली.

नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील विजय सखाराम नाईक (वय ४५, रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एआरएआय टेकडीवर दररोज सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांना टेकडीवरील जंगलात एका युवकाचा मृतदेह आढळून आला.

त्यांनी सकाळी साडेसहा वाजता ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यात डोक्यात मारहाण झाल्याचे दिसून आले. नील विजय नाईक याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

नील नाईक आणि आरोपी हे अल्पवयीन असून एकाच वस्तीत राहतात. अल्पवयीन मुलाला पूर्वी मारहाण करणाऱ्या ओम साळुंके आणि सुशय शिरसाठ यांचे व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवरील स्टेटस नील नाईक याने ठेवले होते.

तेव्हा आरोपी मुलांनी नील नाईक याला म्हटले की, आपण एकाच वस्तीत राहतो, असे असताना तू आम्हाला मारहाण करून जेलमध्ये गेलेल्यांचे स्टेटस का ठेवतोस? यावरून त्यांच्यात मंगळवारी वाद झाला. त्यानंतर त्यांच्यात समेट होऊन ते फिरायला गेले.

रात्री दोघे जण नील नाईक याला घेऊन एआरएआय येथील टेकडीवरील जंगलात आले. तेथे त्यांनी हातोडीने त्याच्या डोक्यात वार करून त्याचा खून केला. पोलीस निरीक्षक सुनील कारोटे तपास करीत आहेत.