आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दीड वर्षापासून फरारी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 20, 2026
Spread the love

पुणे : खराडी परिसरात खंडणी उकळण्याच्या गुन्ह्यात टोळीवर मोक्का कारवाई केल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने जयसिंगपूर येथे शोध घेऊन अटक केली आहे.

सुनील रवींद्र पाटील (वय ३०, रा. राजाराम पाटील नगर, खराडी, सध्या रा. झोपडपट्टी, शाहूनगर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

खराडी परिसरात खंडणी उकळण्यासाठी विनित देवकर व त्याची टोळी दहशत निर्माण करत होती. गेल्या वर्षी पोलिसांनी देवकरला अटक केली होती.

त्याच्यासह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून सुनील पाटील फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट ७ कडील पोलीस अंमलदार किरण पलांडे यांना तांत्रिक माहितीवरून यातील फरार आरोपी सुनील पाटील हा जयसिंगपूर येथे असल्याचे समजले.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जयसिंगपूर येथे शोध घेतला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुनील पाटील याला जयसिंगपूर येथील दसरा चौकात सापळा रचून १९ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला खराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त विवेक मिसाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार भरत उकीर्ड, सारंग दळे, विनायक साळवे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, निर्णय लांडे, अमोल ढोणे, विकास कदम, सुहास तांबेकर, किरण पलांडे, भरत गुंडवाड, नेहा तापकीर आणि प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.