आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आनंद दरबारचा मानवसेवेचा ‘विक्रम’, २२५ अंध बांधवांना मदतीचा हात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 21, 2026
Spread the love

पुणे : राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री. आनंदऋषिजी म. सा. यांच्या १२६व्या जन्मजयंतीनिमित्त आनंद दरबार, कात्रज, पुणे यांच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जन्मजयंतीचे औचित्य साधून अंधजन विकास ट्रस्टच्या २२५ अंध बांधवांना पांढऱ्या काठ्या, ब्रेल लेखन साहित्य, पाण्याचे हांडे तसेच विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी अंध बांधवांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले. तसेच मिठाई आणि भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. आचार्य आनंदऋषिजी महाराज यांच्या ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ या संदेशाला अनुसरून गुप्तदानाच्या भावनेतून करण्यात आलेली ही मदत सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरली.

दृष्टीहीन बांधवांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

पांढरी काठी आणि ब्रेल लेखन साहित्य यांसारख्या साधनांमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाबद्दल अंध बांधवांनी आनंद दरबारच्या आयोजकांचे आभार व्यक्त केले.

जन्मजयंतीनिमित्त आनंद दरबारच्या वतीने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. तसेच माय माऊली केअर वृद्धाश्रम आणि जीन भक्ती मानव सेवा आश्रमातील गरजू व्यक्तींना भोजन देण्यात आले.

धार्मिक श्रद्धेसोबत समाजातील गरजू आणि वंचित घटकांची सेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी उपस्थितांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले.

अंधजन विकास ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार भोर यांच्यासह विविध मान्यवर, भाविक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद दरबार आणि आनंद दर्शन महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

धार्मिक श्रद्धा, मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणत आनंद दरबार, कात्रज यांच्या वतीने आचार्य आनंदऋषिजी महाराजांची १२६वी जन्मजयंती उत्साहपूर्ण आणि सेवाभावी वातावरणात साजरी करण्यात आली.