सामाजिक कार्याची दखल; अजित डुंगरवाल यांना ‘दलित मित्र गौरव पुरस्कार’
दलित महासंघाच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड : 23 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे होणार सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे / सोलापूर : सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले युवा उद्योजक अजित डुंगरवाल यांची दलित महासंघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार 2026’ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेत झालेल्या या निवडीबद्दल विविध सामाजिक क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दलित महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 168 व्यक्तींना ‘दलित मित्र गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे शहराध्यक्ष डॉ. अल्ताफ यांनी दिली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता सोलापूर येथील स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे युवा उद्योजक – अजित डुंगरवाल यांनी उद्योग-व्यवसायासोबतच सामाजिक क्षेत्राशी आपली नाळ कायम जोडून ठेवली आहे. समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दलित महासंघाने 2008 पासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये युवा उद्योजक अजित डुंगरवाल यांच्या नावाचा समावेश झाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याला राज्यस्तरीय सन्मान मिळाला आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही होणार गौरव – यंदाच्या पुरस्कारांमध्ये ह.भ.प. प्रा. विलास जगदाळे यांना जीवन गौरव पुरस्कार, प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांना विशेष गौरव पुरस्कार, तर डॉ. संजय अंधारे यांना सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, उद्योग आणि विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांचाही सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमाला दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, तहसीलदार एफ. आर. शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अजित डुंगरवाल यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत – उद्योग क्षेत्रात कार्यरत राहून सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणाऱ्या अजित डुंगरवाल यांना मिळणारा हा राज्यस्तरीय सन्मान त्यांच्या सामाजिक कार्याची पावती असल्याची भावना त्यांच्या सहकारी व शुभचिंतकांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीमुळे पुण्यातील सामाजिक व उद्योग क्षेत्रातूनही आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
