महिन्याभरानंतरही तन्मय वंगेचा ठावठिकाणा नाही
बी जे मेडिकलचा विद्यार्थी : रॅगिंग झाल्याने तन्मय निघून गेल्याचा पालकांचा होता आरोप
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नीट परीक्षेत साडेपाचशेपेक्षा अधिक गुण मिळवून पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला कोल्हापूरमधील विद्यार्थी तन्मय वंगे हा बेपत्ता झाल्याच्या घटनेला एक महिना उलटल्यानंतरही त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील वसतिगृहात रॅगिंग झाल्याने तो निघून गेल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता. महाविद्यालयाने अँटी रॅगिंग समिती नेमली होती. वसतिगृहात तन्मय वंगे याचे रॅगिंग झाले नसल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे.
तन्मय अजयकुमार वंगे (वय २०, रा. बी. जे. मेडिकल कॉलेज वसतिगृह) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तन्मय वंगे याने वसतिगृहातील सिनिअर विद्यार्थी रॅगिंग करीत असल्याचे आपल्या वडिलांना सांगितले होते.
तो १८ जुलै रोजी हॉस्टेलमधून बाहेर पडला. तो खराडी येथील गावाकडील एका मित्राकडे गेला. त्यानंतर काकांकडे जातो, असे सांगून तो बाहेर पडला. त्यानंतर त्याचा काहीही संपर्क झालेला नाही. त्यानंतर २० जुलै रोजी त्याच्या वडिलांनी खराडी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
खराडी पोलिसांनी केलेल्या तपासात तो पुणे रेल्वे स्टेशनवरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
ही एक्स्प्रेस दौंड, कुर्डुवाडी आणि सोलापूर येथे थांबते. गाडीत बसल्यानंतर लोणी जवळ त्याचा मोबाईल बंद झाला. त्यावेळी दौंड रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीसाठी बंद होते. त्यामुळे तो दौंडला उतरला की पुढे गेला, हे समजू शकले नाही.
त्याच्या मोबाईलचे २१ व २३ जुलै रोजी इंटरनेट काही वेळासाठी सुरू झाले होते. परंतु, ते लगेच बंद करण्यात आले. खराडी पोलिसांनी त्याचा सर्व प्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न केला.
अगदी पंढरपूर, तुळजापूर येथे जाऊनही शोध घेतला. बेवारस मृत्यूची नोंद असलेल्या सर्व ठिकाणी जाऊन खात्री केली. परंतु, कोठेही त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
