डिझायनिंग कोर्सला अॅडमिशन दिल्याचा बनाव करून ७० विद्यार्थ्यांची फसवणूक
फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या संचालकासह दोघांना अटक : विश्रामबाग पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कलिंगा युनिव्हर्सिटीशी संलग्न असल्याचे भासवून, फ्लोरिट कॉलेजची फ्रेंचायजी असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे दाखवून डिझायनिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी पैसे घेऊन ७० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी पुण्यातील संस्थेचा संचालक आणि फ्लोरिट कॉलेजचा संचालक अशा दोघांना अटक केली आहे.
प्रथमेश अशोक राऊत (वय २६, रा. पुनावळे) आणि सचिन भिमराव बोराडे (वय ४२, रा. डोंबिवली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रतिक्षा अशोक राऊत (वय २८, रा. विजय सोसायटी, पुनावळे) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश राऊत हा पुण्यातील संस्थेचा संचालक असून सचिन बोराडे हा फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग या संस्थेचा संचालक आहे. प्रतिक्षा राऊत ही प्रथमेश राऊत याची बहीण असून त्याने तिच्या बँक खात्यात पालकांकडून पैसे स्वीकारले आहेत. याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील एका पालकाने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी बारावी पास झाल्यानंतर तिला इंटेरिअर डिझायनिंगचे शिक्षण घ्यायचे होते. त्यांना इंटरनेटवर फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग या कॉलेजची माहिती मिळाली. त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना पुण्यात येऊन भेटण्यास सांगितले. त्यांनी पुण्यात प्रथमेश राऊत याची भेट घेतली. त्याने फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंगचे पुणे येथील स्टडी सेंटर असून आपण त्याचे हेड असल्याचे सांगितले. त्याने कलिंगा युनिव्हर्सिटीसोबत संलग्न असल्याची कागदपत्रे दाखविली. त्यानुसार त्यांनी १७ जून २०२६ रोजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी सुरुवातीला १० हजार रुपये भरले.
२१ जुलै २०२६ रोजी कॉलेजचे नियमित वर्ग सुरू झाले. ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलीने फोन करून सांगितले की, आमचे कॉलेज दुसऱ्या युनिव्हर्सिटीशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यावर त्यांनी संचालकांना फोन केल्यावर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी मुलीच्या वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणींच्या पालकांशी संपर्क साधला. ते सर्व पालक प्रत्यक्ष कॉलेजमध्ये आले. तेव्हा त्यांना समजले की, या संस्थेचा आणि फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग या कॉलेजचा वाद झाला असून त्यांनी पुण्यातील संलग्नता रद्द केली आहे.
तेव्हा सर्व पालकांनी आमची फी व मूळ कागदपत्रे परत करा, अशी मागणी केली. तसेच ट्रान्सफर सर्टिफिकेट द्या, असे सांगितले. त्याला प्रथमेश राऊत याने नकार दिला. त्यामुळे सर्व ७० पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली.
हे समजल्यावर फ्लोरिट कॉलेजचे संचालक सचिन बोराडे हे पुण्यात आले. पुण्यातील प्रथमेश राऊत याची संस्था आणि मुंबईतील फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्यात वाद निर्माण झाल्याने यावर्षी कॉलेजने राऊत यांच्या संस्थेला प्रथम वर्षासाठी प्रवेश देण्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही. तसेच त्याने जे काही पैसे घेतले, त्याची कोणतीही माहिती आमच्या कॉलेजला मिळाली नाही. या संस्थेतील दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे पैसेही आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना आम्ही पुण्यात सुरू करत असलेल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये सामावून घेऊ, असे सचिन बोराडे यांनी सांगितले.
विश्रामबाग पोलिसांनी प्रथमेश राऊत याला सर्व मुलांचे पैसे परत करण्यास आणि ते मागतात त्याप्रमाणे ट्रान्सफर सर्टिफिकेट देण्यास सांगितले. त्याला त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली असून पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करीत आहेत.
