८०व्या वाढदिवशी रमणलाल लुंकड यांची ‘हिरवी’ भेट!
ऋषी आनंदमध्ये वृक्षारोपण : १३ वर्षांपूर्वी लावलेली ४०० झाडे आज बनली निसर्गाची शान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रमणलाल लुंकड यांनी ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी ऋषी आनंद संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
हडपसर परिसरातील नाल्यालगतच्या पडीक सात एकर जागेत तेरा वर्षांपूर्वी उपाध्याय प. पू. श्री. प्रवीणऋषिजी म. सा. यांच्या प्रेरणेने भामाशाह रमणलाल लुंकड यांच्या पुढाकाराने २४ तीर्थंकरांच्या नावाने २४ भागांत ४०० वृक्षांची लागवड करण्यात आली होती.
तेरा वर्षांनंतर ही झाडे पूर्ण वाढली असून ऋषी आनंद हे आज पर्यावरण, अध्यात्म आणि निसर्गाचे सुंदर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.
या संकल्पनेमागे प. पू. श्री. प्रवीणऋषिजी म. सा. यांची प्रेरणा असून, ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी ऋषी आनंदचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, प्रमोद छाजेड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत.
रमणलाल लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संपूर्ण परिवारासह समाजबांधवांच्या उपस्थितीत वृक्षारोपण झाले.यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, सोनल तुपे, सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री साळुंखे, रमणलाल लुंकड यांच्या पत्नी आशाबाई, सुपुत्र राजेंद्र, रविंद्र, मनिषा लुंकड, मुलगी, जावई, नातवंडे, नातसून तसेच सातववाडी जैन श्रावक संघाचे संघपती झुंबरलाल कोठारी, संघाचे अध्यक्ष सोभाचंद मुथा, महामंत्री सुभाष कोठारी, संघाच्या महिला अध्यक्षा अनिता खाबिया, अशोक खाबिया, प्रवीण चोरडिया, जैन संदेश मासिकाचे संपादक सुभाषबाबू लुंकड आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयकुमार मर्लेचा यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना ऋषी आनंदच्या उभारणीत रमणलालजी लुंकड यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.
त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात ऋषी आनंदमधून होत असल्याचा आनंद व्यक्त करत भविष्यात महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वतंत्र जागा उपलब्ध करून अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
