आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०४ रक्तदात्यांचे रक्तदान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 22, 2026
Spread the love

बार्शी : लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथ व एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, यापैकी तब्बल ८० टक्के रक्तदाते प्रथमच रक्तदान करणारे होते.

गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे तसेच युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजकांनी १०० पेक्षा अधिक रक्तदात्यांचे लक्ष्य ठेवले होते. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हे लक्ष्य पूर्ण केले.

शिबिरात संकलित करण्यात आलेले रक्त श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी, बार्शी यांच्याकडे संकलित करण्यात आले. प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवक-युवतींचा मोठा सहभाग ही शिबिराची विशेष बाब ठरली.

या उपक्रमातून युवकांमध्ये रक्तदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथचे अध्यक्ष लिओ लायन पवन श्रीश्रीमाळ, सचिव लिओ लायन उदयन सावंत, लिओ लायन यश कुंकूलोळ, लिओ लायन आदित्य सोनिग्रा व लिओ लायन शुभम मेहता यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, शिक्षक व्यंकटेश मुंडे, प्रदीप जगदाळे व शिक्षिका दिपाली माळी तसेच विद्यार्थी ओम जगताप, पवन कदम, दुर्गेश कोकाटे, समर्थ आय्यर, सोहम गायकवाड व श्रीनिवास एखंडे यांनी शिबिराच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे १०४ रक्तदात्यांचे रक्तदान झाले असून, “रक्तदान हेच जीवनदान” हा सामाजिक संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.