शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची एक कोटींची फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची १ कोटी १४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ नोव्हेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान ऑनलाइन घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लष्कर भागात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मेसेज पाठविला होता.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने १ कोटी १४ लाख रुपये घेतले.
गुंतवणूक केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना चोरट्यांनी कोणताही परतावा दिला नाही. त्यांनी पैसे काढण्यासाठी रिक्वेस्ट पाठविली; मात्र ती फेल झाली.
त्यांनी संपर्क साधल्यावर त्यांना आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
