गुन्हेगारांकडून २ पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे जप्त
दोघांना अटक : नांदेड सिटी पोलिसांची धायरीत कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून नांदेड सिटी पोलिसांनी दोघा गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून १ लाख ६२ हजार रुपयांची २ पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अनिल प्रकाश लोहबंदे (वय २०, रा. निशिगंध सोसायटी, ऋतुनगरी फेज-२, बेनकर वस्ती, धायरी, पुणे) व वैभव महादेव पोळेकर (वय २१, रा. योगेश्वरी हाईट्स, जिजाऊनगर, पोकळे वस्ती, धायरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार धायरी परिसरातील उंबऱ्या गणपती चौक ते पारी कंपनी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालत होते.
पोलीस अंमलदार भीमराज गांगुर्डे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कैलास जीवन फॅक्टरी परिसरात एक संशयित व्यक्ती प्राणघातक हत्यार बाळगून फिरत आहे.
या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने कैलास जीवन फॅक्टरी परिसरात तात्काळ सापळा रचला. तेथे संशयितरीत्या फिरणाऱ्या अनिल लोहबंदे या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ५० हजार ५०० रुपये किमतीचे १ गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व १ जिवंत काडतूस मिळून आले.
पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली असता, त्याने आणखी एक गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे त्याचा मित्र वैभव पोळेकर याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी धायरी येथील पोकळे वस्ती परिसरातून वैभव पोळेकर यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार ५०० रुपये किमतीचे १ गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत, गणेश कसबे, महेश बिराजदार, पोलीस अंमलदार भीमराज गांगुर्डे, मोहन मिसाळ, मनोहर खराडे, निलेश कुलथे, प्रतीक मोरे, संग्राम शिनगारे, सतीश खोत, राजू वेंगरे, स्वप्नील मगर, शिवाजी क्षीरसागर, निलेश खांबे, उत्तम शिंदे, शुभम चव्हाण व अक्षय जाधव यांनी केली.
