आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पेट्रोल पंपात भागीदारीचे आमिष दाखवून इंजिनिअरची तब्बल सव्वा दोन कोटींची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 22, 2026
Spread the love

पुणे : कराड येथील पेट्रोल पंपामध्ये भागीदार करून घेण्याच्या आमिषाने एका इंजिनिअरची २ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

भूषण प्रभाकर वास्ते (वय ३५, रा. करकम, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत कात्रजमध्ये राहणाऱ्या एका ३७ वर्षीय इंजिनिअरने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रजमधील फिर्यादीच्या घरी नोव्हेंबर २०२१ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी भूषण वास्ते याच्याबरोबर ओळख झाली. भूषण वास्ते याने कराडजवळ सह्याद्री पेट्रोल पंप मित्रांच्या मदतीने चालविण्यास घेतला होता. या पेट्रोल पंपामध्ये भागीदार करून घेतो, असे सांगून त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. भागीदार करून घेण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी स्वतःच्या व सह्याद्री पेट्रोल पंपाच्या खात्यावर मोठ्या प्रमाणावर रक्कम घेतली. परंतु, त्यानंतर त्याने फिर्यादी यांना काहीही परतावा दिला नाही.

मित्रांच्या मदतीने सुरू केलेल्या या पेट्रोल पंपामध्ये भूषण वास्ते याला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला. फिर्यादी यांनी ‘माझे पैसे परत कर’, अशी मागणी केली. त्यानंतर त्याने काही पैसे परत केले. परंतु, वेळोवेळी मागणी करूनही त्याने २ कोटी २९ लाख ८ हजार ३०१ रुपये परत केले नाहीत. त्यानंतर फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आता गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.