पीएमपी बसमधून पडून तरुणीचा मृत्यू
मागून आलेल्या स्कूल बसच्या चाकाखाली सापडली : सिंहगड रोडवरील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगड रोडवर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या पीएमपी बसमधून खाली पडल्याने मागून आलेल्या स्कूल बसच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडून एका तरुणीचा मृत्यू झाला.
कांचन खड्डा (वय २५, रा. कृष्णा हॉस्टेल, गिरीनगर, खडकवासला, मूळ रा. राजस्थान) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना सिंहगड रोडवरील हॉटेल ब्रह्मासमोरील रस्त्यावर सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानापूर ते स्वारगेट ही बस खानापूरहून स्वारगेटकडे जात होती. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
ही तरुणी बसच्या पुढील दरवाजाजवळ उभी होती. तिला पुढे सरकायला जागा नव्हती. बस सुरू असताना ती अचानक बसमधून खाली पडली.
त्याचवेळी पाठीमागून स्कूल बस येत होती. खाली पडलेल्या तरुणीच्या अंगावरून स्कूल बसचे उजव्या बाजूचे मागील चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली.
तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत केली. दोन्ही बसचालकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
