आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विमाननगरमधील हॉटेलमध्ये विनापरवाना संगीत पार्टी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 25, 2026
Spread the love

पुणे : हॉटेलला कोणताही परवाना नसताना तेथे संगीत पार्टी आयोजित करून पहाटे साडेचार वाजेपर्यंत कर्णकर्कश आवाजात स्पीकर्स लावून मद्याचा विनापरवाना पुरवठा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी ६ तरुणींसह ३० तरुण दारूच्या नशेत पहाटेपर्यंत नाचत होते. विमानतळ पोलिसांनी हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. स्नूकर टेबलचा व्यवसाय करत असताना तेथे परवाना नसताना पार्टी आयोजित करून मद्यपुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

हॉटेल मालक नितीन दिवाकर जाधव (वय ४३, रा. मधुबन सोसायटी, विश्रांतवाडी), युवराज प्रमोद नायडू (वय ३४, रा. राजवर्धन हाईट्स, टिंगरेनगर), हॉटेल मॅनेजर दीपक रामचंद्र कांबळे (वय ३५, रा. ताडीवाला रोड), कामगार दीपक रमेश काळेकर (वय २६, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर), सागर उत्तम विश्वास (वय २२, रा. विमाननगर), सुरबती सुपाल सरकार (वय २०, रा. विमाननगर), उत्तम किशनापदा मंडल (वय २९, रा. बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना विमाननगरमधील सोकोरेनगर येथील एअरपोर्ट रोडवरील बॅक बेंचर्स हॉटेलमध्ये २४ ऑगस्टला पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, बॅक बेंचर्स हॉटेल सुरू असून तेथे पहाटेपर्यंत मद्यविक्री सुरू आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलीस तेथे पोहोचले असता, तेथे मोठ्या आवाजात स्पीकर लावून काही पुरुष व महिला नाच करत होते. तेथे बेकायदेशीरपणे मद्यविक्री सुरू होती. पोलिसांनी सर्वांना बाजूला थांबविले.

हॉटेल मालक नितीन जाधव व युवराज नायडू यांनी भागीदारीत हॉटेल सुरू केले आहे. पोलिसांनी हॉटेलचा परवाना, दारूविक्री व दारू ग्राहकांना वितरण करण्याचा परवाना विचारल्यावर मालक नितीन जाधव याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या २४ पुरुषांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले. त्यातील ६ तरुणींची वाहतूक पोलिसांकडील ब्रेथ अ‍ॅनालायझरने तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पोलिसांनी हॉटेलमधून ७ हजार ६९० रुपयांच्या दारूच्या बाटल्या, इतर साहित्य तसेच साऊंड सिस्टीम जप्त केली आहे. हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल गुंड तपास करीत आहेत.