आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून लुटणारे ६ दरोडेखोर जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 25, 2026
Spread the love

पुणे : मोटारसायकलवरून जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे रिक्षातून आलेल्या दरोडेखोरांनी अपहरण करून त्यांना मामुर्डी येथे नेले. तेथे त्यांना मारहाण करून लुटणाऱ्या ६ दरोडेखोरांना पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने जेरबंद केले आहे.

सुरज शंकर चलवादी (वय २४, रा. सिद्धार्थनगर, मामुर्डी, ता. हवेली), दीपक दयानंद भंडगे (वय २४, रा. दादांची पुण्याई, नऱ्हे), अविनाश अरुण वानखेडे (वय २६, रा. झील चौक, नऱ्हे, मूळ रा. दापोडी, वेल्हे), प्रथमेश ऊर्फ प्रतिक हरीभाऊ कंक (वय २७, रा. नऱ्हे, मूळ रा. वेल्हे), विराज ऊर्फ सनी युवराज हिरवे (वय १९, रा. सिद्धार्थनगर, मामुर्डी), ईसाक राजू काजापूरम (वय २८, रा. सिद्धार्थनगर, मामुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. हे आरोपी सराईत असून त्यांच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

फिर्यादी हे २१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता गहुंजे येथील लोढा सोसायटी येथे ऑर्डर देऊन झेप्टो स्टोअरसमोरून गहुंजे स्टेडियम येथून मोटारसायकलवरून जात असताना, त्यांना रिक्षामधून आलेल्यांनी रिक्षा आडवी घालून थांबवले.

त्यांना रिक्षामध्ये घालून अपहरण करून मामुर्डी येथील स्मशानभूमीजवळील मैदानात नेले. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील ९० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट ४ चे पथक करत होते. आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा मिळून येत नव्हता. पोलिसांनी घटनास्थळापासून मामुर्डीपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

रिक्षाचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला. संशयितांचे सीडीआर, तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या ६ सराईत आरोपींना पकडले.

त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या हवाली केले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस अंमलदार राजाराम लोणकर, महेश वायबसे, अमोल बोराटे, गणेश महाडीक, संतोष असवले, सचिन मोरे, गणेश सोनटक्के, अंजनराव सोडगीर, रामदास मेरगळ, शेखर खराडे, अमोल वेताळ, अमोल माटे, बाबाराजे मुंढे, दयानंद खेडकर, संदिप सुखदाणे, सचिन नागरे, प्रशांत सोनवणे, तांत्रिक विश्लेषक त्रिनयन बाळसराफ, पोलीस हवालदार नागेश माळी आणि ननावरे यांनी केली आहे.