आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून जप्त केले २ पिस्टल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 26, 2026
Spread the love

पुणे : दारू विक्रीचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून नांदेड सिटी पोलिसांनी ९० हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल जप्त केले आहेत.

मारुती ऊर्फ मारी बाळू चव्हाण (वय २६, रा. यशवंत विद्यालयाजवळ, लांडगे वस्ती, खडकवासला) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील तपास पथक सोमवारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शुभम ऊर्फ बंटी चव्हाण, प्रतिक ऊर्फ बंटी मोरे व मनोहर खराडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लांडगे वस्ती येथे राहणारा मारी चव्हाण हा कॅनॉलजवळ येणार असून, त्याच्या कमरेला हत्यार आहे.

या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅनॉल रोड परिसरात सापळा रचला. मारुती चव्हाण हा कच्च्या रस्त्यावरून येताना दिसला. पोलिसांनी त्याला पकडले.

त्याची झडती घेतली असता, त्याच्या पॅन्टमध्ये कमरेच्या उजव्या व डाव्या बाजूस खोचून ठेवलेले दोन गावठी पिस्टल मिळून आले. मारुती चव्हाण याच्यावर यापूर्वी दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.

त्याला न्यायालयात हजर केले असता, अधिक तपासासाठी न्यायालयाने २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे अधिक तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे, दत्तात्रय सावंत, पोलीस अंमलदार शुभम चव्हाण, प्रतिक ऊर्फ बंटी मोरे, मनोहर खराडे, भीमराज गांगुर्डे, मोहन मिसाळ, शिवाजी क्षीरसागर, संग्राम शिनगारे, सतीश खोत, राजू वेगरे, स्वप्नील मगर, निलेश कुलथे, निलेश खांबे, उत्तम शिंदे आणि अक्षय जाधव यांनी केली आहे.